नगरपालिका कर्मचाऱ्यांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा
By Admin | Updated: July 2, 2014 00:32 IST2014-07-01T23:52:23+5:302014-07-02T00:32:31+5:30
हिंगोली : विविध मागण्यांसाठी नगर पालिका कर्मचाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

नगरपालिका कर्मचाऱ्यांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा
हिंगोली : विविध मागण्यांसाठी नगर पालिका कर्मचाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
राज्यातील नगर पालिका कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे १०० टक्के वेतन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे करावे, नगर पालिकांमधील अनुकंपाधारकांच्या नेमणुकीसाठी स्थायी- अस्थायी पदाची अट न घालता तत्काळ नियुक्त्या कराव्यात, राज्यातील नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी विशेष अनुदान देण्यात यावे तसेच ३८ पालिकांचे थकीत अनुदान, महागाई भत्ता तत्काळ वितरीत करण्यात यावा, राज्यातील ७८ नगरपालिकांचे कपात होत असलेले सहाय्यक अनुदान त्वरीत थांबवून कपात केलेली रक्कम त्या-त्या पालिकांना वितरीत करावी, शैक्षणिक पात्रता व मूळ विकल्प दिल्यानुसार लेखा शाखेत कर व प्रशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यात यावे, मुख्याधिकारी पदावर ५० टक्के कर्मचारी पदोन्नतीने भरण्यात यावेत आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष विश्वनाथ घुगे यांच्या नेतृत्वाखालील मंगळवारी सकाळी नगरपालिका कार्यालयापासून मोर्चा काढण्यात आला. शहरातील विविध मार्गांवरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाला. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी विश्वनाथ घुगे, शिंदे, बाळू बांगर, राठोड, गायकवाड, भजवणे, पंडीत शिंदे, विजय आठवले, माधव आठवले, राजू आठवले आदींनी सहभाग नोंदविला. (जिल्हा प्रतिनिधी)
नगरपालिकेत कक्षांना कुलूप
नगरपालिका कर्मचाऱ्यांचा मंगळवारी मोर्चा असल्याने सकाळी ११ पासून हिंगोली नगरपालिकेतील सर्वच कक्षांना कुलूप लावण्यात आल्याचे दिसून आले. नगरपालिकेमध्ये एकही कर्मचारी किंवा अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे पालिकेत शुकशुकाट दिसून आला. विविध कामांनिमित्त आलेल्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागले.