जिल्ह्याला दुसऱ्या दिवशी मध्यरात्री अवकाळी पावसाने झोडपले
By Admin | Updated: March 18, 2017 00:02 IST2017-03-17T23:59:52+5:302017-03-18T00:02:43+5:30
लातूर :दिवसभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा मध्यरात्री निलंगा व औसा तालुक्यात तसेच लातूर तालुक्यातील मुरूड व एकुर्गा परिसरात अवकाळी पावसाने झोपडले़

जिल्ह्याला दुसऱ्या दिवशी मध्यरात्री अवकाळी पावसाने झोडपले
लातूर : लातूर जिल्ह्यात बुधवारी लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी व गारपिटीने कहर केला होता़ दिवसभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा मध्यरात्री निलंगा व औसा तालुक्यात तसेच लातूर तालुक्यातील मुरूड व एकुर्गा परिसरात अवकाळी पावसाने झोपडले़ यामुळे रबी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़
औसा तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री नागरसोगा, दापेगाव, तुंगी (बु़), तुंगी (खु़), गाढवेवाडी, जवळगा, पोमादेवी इ. गावांत अवकाळी पाऊस झाला़ तर निलंगा तालुक्यात केळगाव, औराद शहाजानी येथे अवकाळी पाऊस व गारपीट झाली़ औराद शहाजानी महसूल मंडळात गेल्या ४८ तासांत २५ मिमी पाऊस झाला आहे़ शुक्रवारी मध्यरात्री २़३० वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जवळपास अर्धा तास पाऊस झाल्याचे परिसरातील ग्रामस्थांनी सांगितले़ निलंगा तालुक्यातील मुदगड येथे वीज पडल्याने गुंडा नरसा रेड्डी यांचा बैल जागीच ठार झाला़ तर औसा तालुक्यात बुधवारी झालेल्या गारपिटीमुळे ११ जण जखमी झाले आहेत़ शिवाय, आठ जणावरे दगावल्याचे वृत्त आहे़ पहिल्या दिवशी बुधवारी झालेल्या अवकाळी पावसात औसा तालुक्यात २० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते़ नांदुर्गा, भेटा, भादा आदी गावांना अवकाळीचा फटका बसला़ जवळपास २० हजार हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली़ शुक्रवारी मध्यरात्री पुन्हा नागरसोगा, दापेगाव, तुंगी खु़, तुंगी बु़ परिसरात पाऊस पडल्याने मोठे नुकसान झाले आहे़
लातूर तालुक्यातील एकुर्गा, मुरूड, काळे बोरगाव, शिराळा आदी परिसरात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या असून, एकुर्गा शिवारातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे़ सलग दोन दिवस पाऊस झाल्याने हरभरा, गहू, ज्वारी इ. रबी पिकांचेही नुकसान झाल्याचे वृत्त आहे़ हाता तोंडाशी आलेले पीक गेल्याने या परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे़ दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून महसूल व कृषी विभागाच्या वतीने भिसे वाघोली, गाधवड, जोडजवळा, मुरूड परिसरात पंचनाम्याचे काम सुरू झाले आहे़ पहिल्या दिवशी तहसीलदार संजय वारकड यांनी भिसे वाघोली येथील नुकसानीची पाहणी केली असून, आता मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवकाच्या समितीमार्फत पंचनाम्याचे काम हाती घेण्यात आले आहे़ आठ दिवसात या समितीला प्रत्येक गावाच्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत़