समाधानकारक पावसामुळे जिल्हा टँकरमुक्त
By Admin | Updated: September 3, 2014 00:20 IST2014-09-03T00:16:35+5:302014-09-03T00:20:27+5:30
औरंगाबाद : समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न तूर्तास मिटला आहे.

समाधानकारक पावसामुळे जिल्हा टँकरमुक्त
औरंगाबाद : समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न तूर्तास मिटला आहे. गावोगावी नेहमीच्या जलस्रोतांना पाणी आले आहे. त्यामुळे प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे टँकर बंद केले आहेत. परिणामी आठ महिन्यांपासून टँकरवर तहान भागविणारा जिल्हा मंगळवारी टँकरमुक्त झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात यंदा जानेवारी महिन्यापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली होती. त्यामुळे प्रशासनाने ठिकठिकाणी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू केला होता. मे महिन्याच्या अखेरीस टँकरची संख्या १८२ झाली होती. जून महिन्यात पावसामुळे टँकर बंद होतील, अशी अपेक्षा होती; परंतु संपूर्ण जून महिना कोरडा गेला, त्यामुळे पाणीटंचाईची भीषणता वाढली. जूनअखेरीस टँकरची संख्या ३०७ वर पोहोचली. जुलैमध्ये ही संख्या आणखी वाढून ३२७ झाली; मात्र गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. सतत चार दिवस पाऊस बरसत राहिल्यामुळे उन्हाळ्यात आटलेले अनेक स्रोत जिवंत झाले. ठिकठिकाणच्या विहिरी आणि कूपनलिकांना पाणी आले. त्यामुळे बहुसंख्य गावांचा पाण्याचा प्रश्न तूर्तास तरी सुटला. परिणामी प्रशासनाने अनेक ठिकाणचे टँकर बंद केले.
जिल्ह्यात आठ दिवसांपूर्वी २९७ टँकर सुरू होते. चार दिवसांपूर्वी यातील २७१ टँकर बंद करण्यात आले. पैठण, फुलंब्री, वैजापूर, गंगापूर आणि कन्नड हे तालुके टँकरमुक्त झाले. केवळ औरंगाबाद आणि सिल्लोड या दोन तालुक्यांतच २६ टँकरने काही गावांना पाणीपुरवठा केला जात होता; पण आज मंगळवारी हे टँकरही बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्हा टँकरमुक्त झाला आहे.