जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयीन वेळेत राहतात गैरहजर
By Admin | Updated: June 17, 2016 00:31 IST2016-06-17T00:14:55+5:302016-06-17T00:31:30+5:30
लातूर : जिल्हा शल्यचिकित्सक के.एच. दुधाळ हे कार्यालयीन वेळेत दुपारी १२़३० च्या नंतर वारंवार गैरहजर राहतात, असे निदर्शनास आले असून,

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयीन वेळेत राहतात गैरहजर
लातूर : जिल्हा शल्यचिकित्सक के.एच. दुधाळ हे कार्यालयीन वेळेत दुपारी १२़३० च्या नंतर वारंवार गैरहजर राहतात, असे निदर्शनास आले असून, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी तारांकीत, अतारांकीत व लक्षवेधी प्रश्नांवर विचारलेली माहितीही त्यांच्याकडून वेळेत मिळाली नाही, असा ठपका आरोग्य उपसंचालकांनी ठेवला. योग्य खुलासा करण्याचे पत्रही सीएसला पाठविले आहे़
आरोग्य उपसंचालकांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, उदगीर येथील विधान परिषद अतारांकीत प्रश्न क्ऱ ३१४५७, निलंगा येथील अतारांकीत प्रश्न क्ऱ३५६१२ तसेच लक्षवेधी क्रमांक २७० आणि कपात सूचना क्ऱ५५ उपस्थित करण्यात आल्या होत्या़ या प्रश्नांचे आणि कपात सूचनांचे उत्तर देण्यासाठी लातूरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना वेळीच सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या़ या प्रश्नांची उत्तरे सादर करण्यासाठी आरोग्य विभागाच्या मुंबई येथील संचालक कार्यालयाकडूनही सतत पाठपुरावा केला होता़ परंतु, तारांकीत, लक्षवेधी, कपात सूचनांचे उत्तर जिल्हा शल्यचिकित्सकांकडून वेळेत मिळाले नाहीत़ त्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़ परंतु, त्यांनी त्यांचा भ्रमणध्वनी बंद करून ठेवला होता़ अधिवेशन कालावधीत अशी कृती करणे म्हणजे बेजबाबदार वर्तन आहे, असे आरोग्य उपसंचालकांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे़ जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात दुपारी १२़३० च्या नंतर नेहमीच गैरहजर राहणे़ शिवाय, विधान परिषदेमध्ये उपस्थित केलेल्या या प्रश्नांची उत्तरे वेळेत सादर न करणे, वरिष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे या कृतींबाबत शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव आरोग्य विभागाच्या संचालकांकडे का सादर करू नये, याचा खुलासा ज्ञापन प्राप्त झाल्यापासून एक आठवड्याच्या आत सादर न केल्यास आपले काही म्हणणे नाही, असे ग्रहीत धरून पुढील कारवाई करण्यात येईल असेही, आरोग्य उपसंचालक डॉ़ व्ही़ एम़ कुलकर्णी यांनी ज्ञापन पत्रात म्हटले आहे़ दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक के.एच. दुधाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़ मात्र त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता़ कार्यालयातही त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही़