जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधीक्षकांवर ठपका
By Admin | Updated: June 29, 2014 00:36 IST2014-06-29T00:32:51+5:302014-06-29T00:36:31+5:30
माजलगाव: कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेदरम्यान ११ महिलांना भूलीचे इंजेक्शन दिले होते;पण ‘रिअॅक्शन’ झाल्याने नियोजनाच्या अभावाची तहसीलदारांनी गंभीर दखल घेतली़

जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधीक्षकांवर ठपका
माजलगाव: कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेदरम्यान ११ महिलांना भूलीचे इंजेक्शन दिले होते;पण ‘रिअॅक्शन’ झाल्याने शस्त्रक्रि या दुसऱ्यांदा कराव्या लागल्या़ शिबिरातील नियोजनाच्या अभावाची तहसीलदारांनी गंभीर दखल घेतली़ त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक, तालुका वैद्यकीय अधीक्षक यांच्यावर ठपका ठेवला असून कारवाईची शिफारस आरोग्य उपसंचालकांकडे केली आहे़
येथील ग्रामीण रुग्णालयात १० जून रोजी कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया शिबीर पार पडले़ या शिबीरात २० महिला सहभागी झाल्या़ त्यापैकी ११ महिलांना लोकस झायलेशन हे भुलीचे इंजेक्शन देऊन त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली़ मात्र, शस्त्रक्रिया झाल्यावर त्यांना मळमळ होऊ लागले़ त्यानंतर त्यांची पुन्हा तपासणी केली तेंव्हा ‘रिअॅक्शन’ झाल्याचे उघड झाले़ पहिल्यांदा केलेल्या शस्त्रक्रिया ‘फेल’ गेल्याचेही स्पष्ट झाले़ त्यामुळे या महिलांवर दुसऱ्या दिवशी पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या़
या प्रकारानंतर भास्कर शिंदे व डॉ़ भगवान सरवदे यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली़ २७ जून रोजी तहसीलदार डॉ़ अरूण जऱ्हाट यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट दिली़ तेंव्हा रुग्णालयात अस्वच्छता आढळून आली़ त्यांनी शस्त्रक्रिया शिबिराची माहिती घेतली तेव्हा त्यात हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आले़
त्यानंतर जऱ्हाट यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ अशोक बोल्डे यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्कही केली; पण बोल्डे यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही़ त्यांनी शनिवारी आरोग्य उपसंचालक, जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल पाठविला आहे़
अहवालात डॉ़ अशोक बोल्डे व ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ़ सूमंत वाघ यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस केली आहे़
याबाबत तहसीलदार डॉ़ अरुण जऱ्हाट यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी यास दुजोरा दिला़ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ़ वाघ म्हणाले, मला यावर प्रतिक्रिया द्यायची नाही़
(वार्ताहर)