जिल्हा क्रीडा कार्यालय वाऱ्यावर
By Admin | Updated: February 13, 2015 00:50 IST2015-02-13T00:23:42+5:302015-02-13T00:50:25+5:30
सोमनाथ खताळ , बीड येथील जिल्हा क्रीडा कार्यालय सध्या चर्चेचा विषय बनत असून गुरुवारी हे कार्यालय चक्क वाऱ्यावर असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीतून समोर आले.

जिल्हा क्रीडा कार्यालय वाऱ्यावर
सोमनाथ खताळ , बीड
येथील जिल्हा क्रीडा कार्यालय सध्या चर्चेचा विषय बनत असून गुरुवारी हे कार्यालय चक्क वाऱ्यावर असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीतून समोर आले. विशेष म्हणजे ही परिस्थिती नेहमीचीच असल्याचे अधिकाऱ्यांसाठी ‘वेटींगवर’ थांबलेल्या काही व्यक्तींनी सांगितले. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयाला दांडी मारल्यामुळे क्रीडा कार्यालयातील लाखो रुपयांचे साहित्य आणि महत्त्वाची कागदपत्रे रामभरोसेच असल्याचे समोर आले.
या क्रीडा संकुलावर तालुक्यापासून ते विभागीय, राज्यस्तरीय खेळ खेळले जातात. यासाठी राज्यभरातून खेळाडू येथे येतात. त्यांच्यासाठी ना पिण्याच्या पाण्याची सोय आहे, ना स्वच्छतागृहाची सोय. त्यामुळे येथे येणाऱ्या खेळाडूंचे नेहमीच हाल होतात. पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना विकतचे पाणी घेऊन पाजण्याची नामुष्की या कार्यालयावर आली आहे. अनेकवेळा विकतचे पाणी घेऊन खेळाडूंना दिले जात असल्याने खर्च खूप होतो, म्हणून येथील जिल्हा क्रीडा अधिकारी मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासही उदासिनता दाखवत असल्याचा आरोप खेळाडूंमधून केला जात आहे. ही स्थिती केवळ गुरूवारीच होती असे नाही तर एऱ्हवी देखील अधिकाऱ्यांची ‘दांडीयात्रा’ सुरूच असते.