जिल्ह्यात २४ तासात संपतो तब्बल ६० टन ऑक्सिजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:05 IST2021-04-27T04:05:01+5:302021-04-27T04:05:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : औरंगाबादेत २४ तासात तब्बल ६० टन ऑक्सिजन लागत आहे. रोज ऑक्सिजन येतो आणि ...

जिल्ह्यात २४ तासात संपतो तब्बल ६० टन ऑक्सिजन
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : औरंगाबादेत २४ तासात तब्बल ६० टन ऑक्सिजन लागत आहे. रोज ऑक्सिजन येतो आणि संपतो, अशी जिल्ह्याची स्थिती आहे. त्यामुळे एक दिवसही पुरवठा खंडित झाला तर औरंगाबादेत आणीबाणीची परिस्थिती उद्भवू शकते. परंतु, सध्या पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला जात आहे.
औरंगाबादेत कोरोनाग्रस्तांचा आलेख घसरत आहे. परंतु, रोज ऑक्सिजनची मागणी कायम आहे. कारण गंभीर रुग्णांच्या संख्येत रोज भर पडत आहे. त्यामुळे ऑक्सिजनच्या बचतीवर रुग्णालयांकडून भर दिला जात आहे. त्याला बऱ्यापैकी यश येत असल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. परंतु, त्यानंतरही जिल्ह्यात रोज ६० टन ऑक्सिजन लागत आहे. त्यावरून रुग्णांची स्थिती लक्षात येते. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहील, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. औरंगाबादेत पुण्यासह अन्य जिल्ह्यांतून लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा होतो. रुग्णालयांत रोज ऑक्सिजन टँकरच्या चकरा होत आहेत. यात एक दिवसही खंड पडला तर रुग्णांचा श्वास कोंडण्याची स्थिती उद्भवण्याची भीती नाकारता येत नाही. परंतु, रुग्णालयांकडून खबरदारी म्हणून सिलिंडरची व्यवस्था ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
कोरोनासह इतर आजारांवर उपचार घेऊन घरी गेलेल्या रुग्णांनाही ऑक्सिजनची गरज भासते. परंतु, सध्या अनेकांना सिलिंडर मिळत नसल्याची स्थिती आहे. सध्या २०० जम्बो आणि लहान सिलिंडर घरीच असलेल्या रुग्णांना देण्यात आलेले आहेत, अशी माहिती ऑक्सिजन सिलिंडर एजन्सीचे सुजित जैन यांनी दिली.
------
...या ठिकाणाहून मिळतो लिक्विड ऑक्सिजन
औरंगाबादला वाळूज येथील दोन, गेवराई तांडा, शेंद्रा येथील दोन पुरवठादारांकडून ऑक्सिजन पुरवला जातो. यात एअर काॅम्प्रेसरद्वारे हवेतील ऑक्सिजन सिलिंडरमध्ये भरला जातो आणि रुग्णालयांना पुरवठा केला जातो. चाकण-पुणे, रायगड, ठाणे येथून टँकरद्वारे रुग्णालयांना लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा होतो.
---
जिल्ह्यातील रुग्णांची स्थिती
- ऑक्सिजन बेड - २,५०८
- रिक्त ऑक्सिजन बेड - ५१७
- ऑक्सिजनवर असलेले रुग्ण - १,९९१
- व्हेंटिलेटरवर असलेले रुग्ण - ३०५
- घरीच ऑक्सिजनवर असलेले रुग्ण - २००
----
घाटीत आता रोज १९वरून १४ टन लागतो ऑक्सिजन
घाटी रुग्णालयात रोज १८ ते १९ टन ऑक्सिजन लागत होता. परंतु, ‘एनआयव्ही’ऐवजी बायपॅप वापरण्याचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. त्यामुळे घाटीतील ऑक्सिजनची मागणी ५ टन कमी झाली आहे. आता रोज १४ टन ऑक्सिजन लागत आहे, अशी माहिती घाटी प्रशासनातर्फे देण्यात आली. जिल्हा सामान्य रुग्णालयात रोज ६७ जम्बो सिलिंडर लागत आहेत.
----
एका रुग्णालयात ७० ते ८० लीटर वाया
रुग्ण जेवताना, स्वच्छतागृहास जाताना, बोलताना ऑक्सिजन वाया जातो. यातून एका रुग्णालयात दिवसभरात किमान ७० ते ८० लीटर ऑक्सिजन वाया जातो. या बाबींकडे आता रुग्णालयांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यातून वाया जाणाऱ्या ऑक्सिजनची बचत होण्यास मदत होत आहे.
---
काही प्रमाणात कमतरता
खासगी रुग्णालयात काही प्रमाणात ऑक्सिजनची कमतरता आहे. परंतु, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, असे नाही. ऑक्सिजन पुरवठ्याला वेळ लागत आहे. रुग्णांना मात्र त्याचा कोणताही त्रास होत नाही. रुग्णालयांना नियोजन करण्यास वेळ लागतो. त्यामुळे ऑक्सिजन संपण्यापूर्वीच नियोजन केले जाते आहे. रोज जवळपास ४५ ते ५५ टन ऑक्सिजन लागत आहे. ऑक्सिजन बचतीवर भर दिला जात आहे. जनजागृती केली जात आहे.
- डाॅ. हिमांशू गुप्ता, अध्यक्ष, मराठवाडा हाॅस्पिटल असाेसिएशन
------
ऑक्सिजन पुरवठा सुरळीत
औरंगाबाद जिल्ह्यात सध्या दररोज ६० टन ऑक्सिजन लागत आहे. रोज ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. हा पुरवठा सुरळीत नसता तर गोंधळ उडाला असता. पण सध्या ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत आहे.
- संजय काळे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन (औषध)