जि. प. अध्यक्षपदाच्या मोर्चेबांधणीचे मार्ग खुले
By Admin | Updated: September 5, 2014 00:53 IST2014-09-05T00:20:00+5:302014-09-05T00:53:16+5:30
औरंगाबाद : निवडणुका ठरलेल्या वेळेवर घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्यामुळे आता इच्छुकांच्या मोर्चेबांधणीचे मार्ग खुले झाले आहेत.

जि. प. अध्यक्षपदाच्या मोर्चेबांधणीचे मार्ग खुले
औरंगाबाद : जिल्हा परिषद व पंचायत समिती अध्यक्ष-उपाध्यक्ष व सभापती- उपसभापती पदाच्या निवडणुका ठरलेल्या वेळेवर घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्यामुळे आता इच्छुकांच्या मोर्चेबांधणीचे मार्ग खुले झाले आहेत. सत्ता टिकविण्याचे आव्हान काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेसमोर आहे.
शिवसेनेची १५ वर्षांची सत्ता काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेने अडीच वर्षांपूर्वी एकत्रित येऊन मोडीत काढली होती. हा चमत्कार हे तिन्ही पक्ष पुन्हा करणार काय, असा प्रश्न सध्या विचारला जातो आहे. यावेळेस काँग्रेसचे सदस्य संख्या बळ १ ने घटले असून, शिवसेनेचे वाढले आहे. सातारा गटात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना विजयी झाल्याने हा चमत्कार झाला. तरीही शिवसेना व भाजपा युतीचे २४ सदस्य होतात. अध्यक्षपद मिळविण्यासाठी ३१ सदस्यांचा पाठिंबा हवा आहे. राजकारणात काही उलट फेर झाला तरच शिवसेना पुन्हा सत्तेत येऊ शकते.
यावेळेस अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी खुले आहे. त्यामुळे काँग्रेसचे विद्यमान गटनेते विनोद तांबे यांनी जोर लावला आहे. श्रीराम महाजन, प्रभाकर काळे (सोयगाव) हेदेखील प्रयत्नात आहेत. उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून रामदास पालोदकर यांचे नाव चर्चेत आहे. मनसेच्या मूडवर पुढील सत्ता अवलंबून आहे. तत्पूर्वी दि. १४ सप्टेंबर रोजी ९ पं. स.च्या सभापती व उपसभापतीपदाच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत सत्ता संघर्ष कसा राहील, त्यावर जि.प.ची सत्ता कुणाकडे हे ठरणार आहे.