उदगीरच्या नायब तहसीलदारांसाठी जिल्हाभर लेखणी बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2016 00:03 IST2016-01-15T00:03:34+5:302016-01-15T00:03:34+5:30
लातूर : उदगीर तहसील कार्यालयात सोमवारी नायब तहसीलदार बालाजी चितळे व अव्वल कारकुन एम़ टी़ बुरांडे यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची

उदगीरच्या नायब तहसीलदारांसाठी जिल्हाभर लेखणी बंद आंदोलन
लातूर : उदगीर तहसील कार्यालयात सोमवारी नायब तहसीलदार बालाजी चितळे व अव्वल कारकुन एम़ टी़ बुरांडे यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ गुरुवारी जिल्ह्यात महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील दहाही तहसील कार्यालयांतील महसूल कर्मचारी सहभागी झाले होते.
शिधापत्रिका व स्वस्त धान्य दुकानाच्या विषयावरून सुधाबाई कांबळे, नीळकंठ पाटील, बाबुराव आंबेगावे, बळीराम पाटील यांनी सोमवारी दुपारी नायब तहसीलदार बालाजी चितळे व अव्वल कारकुन एम़ टी़ बुरांडे यांच्या टेबलवरील फाईलची नासधूस करीत कार्यालयीन कामकाजात अडथळा आणत शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली़ अशी तक्रार चितळे यांनी दिल्याने सोमवारीच उदगीर शहर पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला़ दरम्यान, मंगळवारी सुधाबाई कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नायब तहसीलदार चितळे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ या घटनांचा निषेध करीत गुरुवारी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या उदगीर शाखेने लेखणी बंद आंदोलन केले़ आरोपींना अटक करुन चितळे यांच्यावर नोंदविण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी संघटनेने केली आहे़ दरम्यान, जिल्हाभर महसूल कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला. उदगीरात नायब तहसीलदार रेणुकादास देवणीकर, बालाजी चितळे, येरमे, अव्वल कारकून राजे, येमपल्ले, हिसामोद्दीन, डीक़े़ मोरे, मंगला हाळे, सत्यकांत थोटे, बुरांडे, मंडळ अधिकारी दिलीप मजगे, गणेश हिवरे आदी सहभागी होते. (प्रतिनिधी)