जिल्हा हिवताप कार्यालय स्थलांतर रखडले
By Admin | Updated: September 23, 2014 23:50 IST2014-09-23T23:47:21+5:302014-09-23T23:50:51+5:30
जालना : जिल्हा हिवताप कार्यालयाची इमारतही पाडण्यात येणार असल्याने या कार्यालयाचे तात्पुरत्या स्वरूपात जुन्या तहसील कार्यालयात स्थलांतर करण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

जिल्हा हिवताप कार्यालय स्थलांतर रखडले
जालना : गांधीचमन येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या जिल्हा हिवताप कार्यालयाची इमारतही पाडण्यात येणार असल्याने या कार्यालयाचे तात्पुरत्या स्वरूपात जुन्या तहसील कार्यालयात स्थलांतर करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे या स्थलांतराचे आदेश जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी दिले आहेत.
गांधीचमन येथील जिल्हा स्त्री रूग्णालयाच्या नवीन इमारतीचा शुभारंभ गेल्या काही दिवसापूर्वी झाला. जीर्ण झालेली ही इमारत पाडण्याच्या कामास वेग आला असून या भागात स्थित असलेल्या जिल्हा हिवताप कार्यालयास जिल्हा स्त्री रूग्णालयाच्या वतीने कार्यालय इतरत्र हलविण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र सध्या जिल्हा हिवताप कार्यालय हे जुने तहसील कार्यालय येथे हलविण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट आदेश दिलेले असताना काही अपहार्य कारणास्तव जिल्हा हिवताप कार्यालय स्थलांतर होण्यास अडचण निर्माण होत आहे.
जुने तहसील कार्यालयाची डागडुजी तसेच काही जुने साहित्य तेथे स्थित असल्यामुळे तहसीलदार यांच्याकडून अद्याप जुन्या इमारतीचा ताबा देण्यात आलेला नाही.
जुने तहसील कार्यालय दुरूस्तीकरीता काही काळ लागणार असल्याचे समजते. ेत्यामुळे हिवताप कार्यालय तेथे सध्या स्थलांतर होऊ शकत नाही. तर दुसरीकडे स्त्री रूग्णालय प्रशासनाच्या वतीने जिल्हा हिवताप कार्यालय स्थलांतरण करण्याबाबत वारंवार पाठपुरावा होत आहे.
जिल्हा हिवताप अधिकारी तोनगिरे यांना विचारले असता, जुनी तहसील इमारत येथे जाण्यास काही हरकत नाही, परंतू त्या इमारतीच्या खिडक्या आणि काही दुरूस्तीचे कामाअभावी तेथे असुरक्षित असल्यामुळे सध्या स्थलांतर करणे शक्य नाही. शिवाय तहसीलदार यांच्यामार्फत सध्या ताबा देण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले.
तहसीलदार रेवननाथ लबडे म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश दिलेले आहेत. परंतु जुन्या तहसील कार्यालयात काही दुरूस्तीचे काम सुरू आहे. हे काम झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा हिवताप कार्यालयाचे स्थलांतर होणार आहे. (प्रतिनिधी)