छत्रपती संभाजीनगर : शासकीय सावित्रीबाई महिला राज्यगृहात राहणाऱ्या अनाथ असलेली पूजा हिचा शुक्रवारी अण्णासाहेब सातपुते या युवकाशी विवाह संपन्न झाला. शासनाच्या अनाथाश्रमातील ही कन्या सातपुतेंच्या घरची सून झाली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, त्यांच्या पत्नी करुणा स्वामी यांनी मुलीचे पालक म्हणून कन्यादान केले. अतिशय भारावून टाकणारा हा विवाह सोहळा पुंडलिकनगर रोडवरील एन-४ येथील एका मंगल कार्यालयात पार पडला.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे आणि राज्यगृहाच्या अधीक्षक अपर्णा सूर्यवंशी, विभागीय उपायुक्त हर्षा देशमुख यांनी विवाहाच्या तयारीत मोलाची भूमिका बजावली. या विवाह सोहळ्यासाठी राजेंद्र झंवर, कांचन साठे, रश्मी कुमारी, कविता वाघ यांनी सहकार्य केले. पूजा हिचे पैठण येथील बालगृहात बालपण गेले. तेथेच तिचे प्राथमिक शिक्षण झाले. वयाच्या १८ व्या वर्षानंतर ती महिला व बालविकास विभागाच्या छत्रपती संभाजीनगर येथील सावित्रीबाई राज्यगृहात आली.
काळजीपूर्वक निवड आणि प्रक्रिया...या विवाहासाठी अण्णासाहेब सातपुते यांच्या आई-वडिलांनी राज्यगृहात संपर्क साधला होता. त्यानुसार वर-वधू पसंती झाली. अण्णासाहेब जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार नोंदणी केंद्रात व्यवस्थापक या कंत्राटी पदावर कार्यरत आहेत. पूजा ही १० वी उत्तीर्ण असून, तिने फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. सगळी माहिती, कौटुंबिक पार्श्वभूमी, मानसिकता, जबाबदारीची जाण लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली. आधी सोमवारी नोंदणी विवाह झाला. विवाहास पारंपरिक संस्कारांचे स्वरुप मिळावे म्हणून शुक्रवारी विधिवत समारंभ पार पडला. ‘मला आता हक्काचे कुटुंब मिळाले आहे. याक्षणी मी अतिशय आनंदी आहे’, अशी भावना पूजाने व्यक्त केली.