जिल्ह्यात ठिकठिकाणी गणरायाला भावपूर्ण निरोप
By Admin | Updated: September 11, 2014 00:24 IST2014-09-11T00:07:26+5:302014-09-11T00:24:15+5:30
नांदेड : ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना जिवाला,’ गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ आदी विविध घोषणांच्या निनादात शहर व जिल्ह्यात गणरायाला सोमवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला.

जिल्ह्यात ठिकठिकाणी गणरायाला भावपूर्ण निरोप
नांदेड : ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना जिवाला,’ गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ आदी विविध घोषणांच्या निनादात शहर व जिल्ह्यात गणरायाला सोमवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला.
उमरीत २६ गणेश
मंडळांचे विसर्जन
उमरी : शहरातील २६ मंडळांची सकाळी ढोलताशांच्या गजरात मिरवणूक निघाली. बालाजी मंदिर, मोंढा मैदान, मज्जीदगल्ली ते जुना गाव वस्तीतून आल्यानंतर गावतलावात रात्री उशिरापर्यंत गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते सय्यद चॉंद यांनी सर्व गणेश मंडळाचे पुष्पहाराने स्वागत केले. यावेळी नगराध्यक्ष राजेश देशमुख, शिरीषराव गोरठेकर, उपनरगाध्यक्ष प्रवीण सारडा, माजी नगराध्यक्षा सुभाष पेरेवार, तहसीलदार जाधव, नायब तहसीलदार प्रिया पाटील, पोलिस निरीक्षक एम.ए. इनामदार, उपनिरीक्षक प्रवीण देशमुख, खेडकर, शिवाजी हेमके, संजय कुलकर्णी, किशोर पबीतवार उपस्थित होते.
देगलुरात पारंपरिक वाजंत्रीचा वापर
देगलूर : देगलुरात कर्णर्कश ध्वनीक्षेपकाचा वापर टाळत सर्वच गणेश मंडळांनी पारंपरिक वाजंत्रीचा केलेला वापर हे यावर्षीच्या मिरवणुकीचे वैशिष्ठे ठरले. तसेच गुलालाचाही मर्यादित वापर करण्यात आला. पालिका प्रशासनाने मिरवणूक मार्ग व विसर्जन स्थळापर्यंत प्रकाश झोताची व्यवस्था केली. विसर्जन मार्गावर शहाजीनगर गणेश मंडळ, भाजपा तसेच शांतीप्रिया गणेश मंडळाकडून गणेशभक्तांसाठी प्रसाद आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सहाय्यक जिल्हाधिकरी रवींद्र बिलवडे, तहसीलदार जीवराज डापकर, मुख्याधिकारी रामदास पाटील यांनीही ठिकठिकाणी भेटी दिल्या.
धर्माबादकरांनी केले विसर्जन
धर्माबाद: शहर व परिसरातील बहुतांश गणेशमंडळांनी बासर येथे गणेश विसर्जन केले. तालुक्यातील सीरजखोड, बाभळी आणि बाळापूर तलावातही छोटे-मोठ्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. डीवायएसपी विष्णूपंत बेद्रे, पोलिस निरीक्षक अनंत पराड, सहाय्यक पोलिस निरीक्षक भापकर, बोर्डे, पोलिस उपनिरीक्षक शंकर वाघमोडे,ओंकार गिरी यांनी बंदोबस्त ठेवला.
किनवटमध्ये उत्साहाचे वातावरण
किनवट : लहान- मोठ्या गणेशमंडळांनी आपआपल्या परिने मिरवणूक काढली. पैनगंगेच्या तिरावरील विसर्जन घाटावर श्री विसर्जन करण्यात आले. सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय कांबळे, तहसीलदार शिवाजी राठोड, पोलिस निरीक्षक संजय जोगदंड लक्ष ठेवून होते. याशिवाय नगराध्यक्षा इंदुताई कनाके, उपनगराध्यक्ष साजीदखान, नगरसेवक, विविध पक्षाने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
निवघा परिसर
निवघा: परिसरातील शिरड, निवघा, पेवा, मनुला, कोळी, चक्री, हस्तरा, बोरगाव, येळंब, धानोरा रुई येथील गणरायाचे कयाधू नदीत विसर्जन करण्यात आले.
अर्धापुरात शांततेत विसर्जन
अर्धापूर : अर्धापूर येथील हनुमान मंदिराच्या चौकात दुपारी सर्व मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र आले व विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणूक बाजारचौक, जामा मस्जिद, श्रीरामनगर मार्गे विसर्जनस्थळी पोहोचली. तेथे सामूहिक आरती होऊन गणरायाला निरोप देण्यात आला. जामा मस्जिदीच्या ठिकाणी नगराध्यक्ष नासेरखान पठाण, उपनगराध्यक्ष राजू शेट्टे, नगरसेवक काजी सलाऊद्दीन, पप्पू बेग यांनी गणेश मंडळांचे स्वागत केले. यावेळी पोलिस उपाधीक्षक मधुकर औटे, सय्यद सुलेमान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी बंदोबस्त ठेवला. मिरवणुकीत तहसीलदार सतीश सोनी, नायब तहसीलदार देलमडे, मंडळ अधिकारी वामनराव उबाळे, तलाठी शेख शफीयोद्दीन, शांतता समितीचे सदस्य, नागरिक सहभागी झाले होते.
भोकरमध्ये गणरायाला निरोप
भोकर: शहरातील सार्वजनिक गणेश मंडळासह सर्व गणेश मंडळाच्या श्रीला ढोल-ताशांच्या गजरात व गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणेत भावपूर्ण निरोप देण्यात आला. नवा मोंढा येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या श्रींची व शहरातील सर्वच गणेश मंडळाच्या मूर्तीची वाजतगाजत मिरवणूक निघाली. बालाजी मंदिरापासून निघालेली ही मिरवणक आंबेडकर चौक, गांधीचौक करीत दत्त गडावरील तलावाजवळ पोहोचली. रात्री ११.३० पर्यंत सर्व गणेशाचे विसर्जन करण्यात आले. पोलिस प्रशासन शांतता कमेटीचे सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.
देखावे पाहण्यासाठी सिडको-हडकोत गर्दी
नवीन नांदेड : नवीन नांदेड भागातील वाघाळा, असदवन, असर्जन, जिंदमनगर, गोपाळचावडी, विष्णूपुरी, बळीरामपूर, काकांडी, तुप्पा, असर्जन, जुना व नवीन कौठयासह सिडको-हडको परिसरातील एकूण ७८ श्री गणेश मंडळांचे पदाधिकारी व त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्री शांततेत, उत्साहात व ढोल - ताशांच्या गजरात आपल्या आवडत्या गणरायाला निरोप दिला. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही बळीरामपूर येथील जय महाराष्ट्र गणेश मंडळ व जयव्यंकटेश महालक्ष्मी गणेश मंडळाच्या वतीने विसर्जन मिरवणुकीदरम्यान, सद्य:स्थितीत सर्वत्र सुरूअसलेल्या चालू घडामोडींवर आधारलेला नाट्यप्रयोग उत्कृष्टपणे सादर करण्यात आला. जय महाराष्ट्र गणेश मंडळाकडून २४ तास आॅन डयुटी अर्थात ‘सिंघम’या चित्रपटावर आधारित तर, जयव्यंकटेश महालक्ष्मी गणेश मडंळाकडून ‘पंढरीची वारी आणि भक्त पुंडलिक’ हे नाटक सादर करण्यात आले. दोन्ही नाटय प्रयोगातील कलावंतांनी आपली भूमिका अगदी सरसपणे सादर करून हजारो गणेशभक्तांची मने जिंकून टाळयांचा कडकडाट मिळविला. वाघाळा शहर ‘ब्लॉक’ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सिडको व हडको परिसरातील बहुसंख्य श्री गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला, तर आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनीही सिडको - हडकोतील गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. मिरवणुकीतील पदाधिकारी व गणेशभक्तांसाठी सिडको - हडकोतील व्यापारी बांधवांसह सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खिचडी व प्रसादासह पाणीपॉकेट वाटप केले. पो.नि. संपत शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक प्रभा पुंडगे, एम.टी. निकम, पोउपनि. किशन राख, एन.डी. रोडे, सहा. पोउपनि. रमेश खाडे व त्यांच्या सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला.
दहेलीत शांततेत विसर्जन
सारखणी : दहेली येथे श्री गणेश मूर्तीचे विसर्जन उत्साहात करण्यात आले़ मिरवणुकीत श्री शिवशक्ती, शिवाजी, श्रीराम, समता, एकता साठे, अष्टविनायक, श्रीकृष्ण गणेश मंडळांनी सहभाग घेतला़ आकर्षक देखावे सादर केली.
पोलिसाविना विसर्जन
फुलवळ : फुलवळ व परिसरातील गणेश विसर्जन शांततेत पार पडले़ विशेष म्हणजे, पोलिस बंदोबस्ताविना फुलवळ येथे मिरवणूक काढण्यात आली़ यात टी़डी़मंगनाळे, विठ्ठल मंगनाळे यांनी नियोजन केले़ सोमसवाडी व मुंडेवाडी, गऊळ, कंधारेवाडी, पानशेवडी, बिजेवाडी, जंगमवाडी, केवळातांडा येथील विसर्जनही शांततेत पार पडले़
हिमायतनगर: ८६ ‘श्रीं’चे विसर्जन
हिमायतनगर : तालुक्यातील ८६ गणेश मंडळाचे विसर्जन शांततेत पार पडले़ हिमायतनगर येथे मुस्लिम बांधवांनी गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला़ यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष अन्वर पठाण, रफीक सेठ, सरदारखान, फिरोज खान, शेख चांद शेख रहीम, समद खान, अखिल, फेरोज खान, अब्दुल मन्नान आदींची उपस्थिती होती़ ग्रा़पं़च्या वतीने ज्ञानेश्वर शिंदे, जावेदभाई, सुभाष शिंदे, उदय देशपांडे, रामदास ठाकरे, हनुसिंग ठाकूर, सरदारखान पठाण, संतोष बनसोडे, शेख रहीम, ग्रामसेवक गर्दनवार आदींनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला़
माहूर तालुक्यात
श्री विसर्जन शांततेत
माहूर : श्रीक्षेत्र माहूरसह तालुक्यात श्री गणेश विसर्जन उत्साहात व शांततेत पार पडले़ यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता़ श्री विसर्जनाची ढोलताशे व डीजेच्या गजरात मिरवणूक काढून गणरायास निरोप देण्यात आला़ यावेळी सह्याद्रीचा राजा गणेश मंडळाच्या मिरवणुकीत उत्कृष्ट देखाव्यासह महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता़ शिवश्रद्धा गणेश मंडळाचे अध्यक्ष राजू चव्हाण, जयभवानी गणेश मंडळाचे अध्यक्ष राजू चव्हाण, जयभवानी गणेश मंडळाचे अध्यक्ष अजय बोरकर, नवयुवक मंडळाचे मंगेश कान्नव, सुवर्णकार मंडळाचे अमोल सावंत, अष्टगंध मंडळाचे निलेश तायडे, वीर गणेश मंडळाचे पुंडलिक पवार, जय सेवादास मंडळाचे संदीप जाधव, सिद्धीविनायक गणेश मंडळाचे संतोष तामखाने, कपिल मुनी मंडळाचे प्रमोद माने, आदर्श गणेश मंडळाचे शुभम ठाकूर तर सह्याद्रीचा राजा गणेश मंडळाचे अध्यक्ष तथा उद्योजक सुमीतभाऊ राठोड, वक्रतुंड मंडळाचे सुनील गजांकुशकर, लंबोदर मंडळाचे कैलास राठोड यांचा नगराध्यक्षा गौतमी कांबळे, उपाध्यक्षा शोभाताई महामुने, माजी नगराध्यक्ष समर त्रिपाठी, नगराध्यक्ष प्रा़राजेंद्र केशवे यांच्यासह मान्यवरांनी सत्कार केला़ अतिरिक्त पोलिस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय कांबळे, पो़नि़ डॉ़अरूण जगताप, सपोनि अनिल जाधव, सपोनि जगदीश गिरी, पोलिस उपनिरीक्षक प्रियंका वासनिक यांच्यासह शंभरावर पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता़
हदगाव:१९० ‘श्री’ना निरोप
हदगाव: तालुक्यातील १४५ गावांतील १९० श्री मूर्तीला जनतेने निरोप दिला़ हदगाव शहरात ३६ गणपती मूर्तीचे विसर्जन पैनगंगा नदीत मरण्यात आले़ हदगाव ठाण्यांतर्गत ५४ गावांतील ४० श्रींचे विसर्जन शांततेत पार पडले़ तामसा ठाण्यांतर्गत ५९ गणपतींची स्थापना करण्यात आली होती़ यापैकी ४२ ग्रामीण व तामसा शहरात १७ गणपतींचे विसर्जन रात्री शांततेत झाले़ मनाठा ठाण्यांतर्गत ५९ गणपतींचे विसर्जन उत्साहात झाले.
कंधार येथे ‘श्रीं’ चे
विसर्जन उत्साहात
कंधार : ढोल, डीजे आदी वाद्यांसह मिरवणूक काढण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक विरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अंगद सुडके, पीएसआय संदीप दुनगहू, पोलिस अधिकारी, पोलिस, होमगार्ड आदींचा बंदोबस्त होता. (ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून)