जिल्हा रूग्णालयावर होणार ‘उपचार’!
By Admin | Updated: June 7, 2017 00:22 IST2017-06-07T00:21:44+5:302017-06-07T00:22:11+5:30
बीड : डॉक्टरांची रिक्त पदे, अपुरी जागा, नादुरूस्त मशिनरी यामुळे जिल्हा रूग्णालय ‘आजारी’ पडले होते.

जिल्हा रूग्णालयावर होणार ‘उपचार’!
सोमनाथ खताळ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : डॉक्टरांची रिक्त पदे, अपुरी जागा, नादुरूस्त मशिनरी यामुळे जिल्हा रूग्णालय ‘आजारी’ पडले होते. हाच धागा पकडून लोकमतने ‘रूग्णालय सलाईनवर’ या मथळ्याखाली तीन भागात वृत्त मालिका प्रकाशित करून ही गंभीर बाब समोर आणली होती. याचीच दखल घेत मंगळवारी मंत्रालयात आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी बैठक घेऊन जिल्हा रूग्णालयाचा प्रश्न १५ दिवसांत मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे आता रूग्णांना सुविधांबरोबरच वेळेवर उपचार मिळणार आहेत.
बीडचे जिल्हा रूग्णालय ३०० खाटांचे आहे. परंतु प्रत्यक्षात अॅडमिट होणाऱ्या रूग्णांची संख्या खाटांच्या तुलनेत तिप्पट आहे. त्यामुळे अनेकवेळा रूग्णांना जमिनीवर झोपवून उपचार करावे लागतात. यामध्ये गंभीर आजार असलेल्या रूग्णांचाही समावेश आहे. यातच बाह्य रूग्णांची संख्याही दोन हजाराच्या घरात आहे. एवढ्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी मात्र बोटावर मोजण्याइतकेच डॉक्टर आहेत. डॉक्टरांना सहकार्यासाठी नर्सची संख्याही खूपच कमी आहे. या सर्वांचा फटका रूग्णांना सहन करावा लागतो. वेळेवर उपचार होत नसल्याने टोकाचे वादही झाले. अनेकांचा जीव डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच गेल्याचे आरोप नातेवाईक करायचे, या सर्व परिस्थितीमुळे जिल्हा रूग्णालयाची प्रतिमा मलीन झाली होती. हाच धागा पकडून ‘लोकमत’ तीन भागांत ‘रूग्णालय सलाईनवर’ या मथळ्याखाली मालिका प्रकाशित केली. यामध्ये सर्व बाबींचा आढावा घेतला होता. याचीच दखल घेत डॉ.सावंत यांनी मंगळवारी बैठक बोलावली होती. यामध्ये बीडचे आ.जयदत्त क्षीरसागर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश चव्हाण उपस्थित होते. सावंत यांच्यापुढे जिल्हा रूग्णालयाचा प्रश्न मांडण्यात आला. लोकमतची वृत्त मालिका पाहिल्यावर डॉ.सावंत यांना जिल्हा रूग्णालयाची गंभीर परिस्थिती लक्षात आली. त्यांनी रूग्णालयात सुविधा तसेच इतर प्रश्न १५ दिवसांत मार्गी लावण्याचे आश्वासन आ. क्षीरसागर यांच्यासह डॉ. सांगळे, डॉ.चव्हाण यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.