जिल्हा रुग्णालय ‘व्हेंटेलेटर’वर!

By Admin | Updated: January 20, 2017 00:19 IST2017-01-20T00:18:41+5:302017-01-20T00:19:20+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ग्रामस्थांना आरोग्याची सेवा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जिल्हा रुग्णालय मात्र, मागील अनेक महिन्यांपासून ‘व्हेंटेलेटर’ आहे़

District Hospital 'Ventilator'! | जिल्हा रुग्णालय ‘व्हेंटेलेटर’वर!

जिल्हा रुग्णालय ‘व्हेंटेलेटर’वर!

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ग्रामस्थांना आरोग्याची सेवा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जिल्हा रुग्णालय मात्र, मागील अनेक महिन्यांपासून ‘व्हेंटेलेटर’ आहे़ बंद पडणारी सिटीस्कॅन, एक्स-रे मशीन, एकाच सोनोग्राफी मशीनवर पडणारा दोन रुग्णालयांचा भार, अपुरे वैद्यकीय अधिकारी अशा एक ना अनेक समस्यांनी सध्या जिल्हा रुग्णालयाला ग्रासले आहे़ मागील दीड-दोन वर्षात राज्याचे आरोग्यमंत्री डॉ़ दीपक सावंत यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले़ या कालावधीत आरोग्यविषयक वरील समस्या अपेक्षितरित्या सुटलेल्या नाहीत़ आता दिवाकर रावते यांनी पालकमंत्री म्हणून सुत्रे हाती घेतली आहेत. जिल्हा रुग्णालयाचा ढेपाळलेला कारभार सुधारण्याबाबत ते ठोस निर्णय घेणार का? याबाबत उत्सुकता आहे.
उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात दैनंदिन सरासरी एक हजार रुग्ण औषधोपचारासाठी येतात़ तर अंतररुग्ण विभागात २०० ते ३०० रुग्ण उपचार घेतात़ शिवाय ६० खाटाच्या स्त्री रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दैनंदिन १०० रुग्ण येत असून, अंतररुग्ण विभागात प्रसुतीसह इतर उपचारासाठी येणाऱ्या सरासरी १२० ते १४० महिला दाखल असतात़ स्त्री रुग्णालयाचे कामकाज सुरू होऊन दोन वर्षाहून अधिक कालावधी लोटला असला तरी या रुग्णालयासाठी स्वतंत्र सोनोग्राफी मशीन मिळालेली नाही़ परिणामी महिलांना सोनोग्राफीसाठी जिल्हा रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागते़ जिल्हा रुग्णालयातील रुग्ण आणि महिला रुग्णालयातील रुग्णांची संख्या अधिक असल्याने सोनोग्राफीचा नंबर येण्यासाठी एक ते दोन आठवडे पुढील नंबर देण्यात येतो़ महिला नातेवाईकांना रात्रीच्यावेळी थांबण्यासाठी धर्मशाळेचे बांधकाम करण्यात आलेले नाही़ शिवाय रुग्णांच्या नातेवाईकांसाठी स्वतंत्र सार्वजनिक शौचालय नसल्याने मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो़ तर रुग्णालयातील स्वच्छतागृहांचाही वापर करता येत नसल्याच्या तक्रारी आहेत़ स्त्री रुग्णालयातील रुग्णांची संख्या पाहता ६० खाटाच्या या रुग्णालयाला १०० खाटाच्या रुग्णालयात रूपांतरित करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे़ मात्र, हा प्रस्तावही धूळखात पडला आहे़
जिल्हा रुग्णालयातील एक्स-रे, सिटीस्कॅनची यंत्रणा जुनाट असल्याने कधी बंद पडेल याचा पत्ता लागत नाही़ या यंत्रणा बंद पडल्यानंतर रुग्णांना थेट खासगी ठिकाणी नेऊन सिटीस्कॅन, एक्स-रे करून घ्यावे लागत आहेत़ तर अपुरे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यामुळेही रुग्णांसह नातेवाईकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो़ रुग्णालयातील लिफ्ट बंद पडण्याचा प्रकार तर नवीन नाही़ दोन लिफ्ट असताना केवळ एक लिफ्ट सतत बंद असते़ ‘सिव्हील’सह महिला रूगणालयातील समस्या पाहता आ़ राणाजगजितसिंह पाटील, माजी खा़ डॉ़ पद्मसिंह पाटील यांनी दोन्ही रुग्णालयांना भेटी देऊन तत्कालीन पालकमंत्री डॉ. सावंत यांच्यासमोर मांडल्या होत्या. समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने विशेष बैठक मुंबईत घेण्यात आली होती. समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने बैठकीत निर्णयही झाला होता. परंतु, बैठक होवून अनेक महिन्यांचा कालावधी लोटला. परंतु, समस्या जैैसे थे आहेत. दस्तुरखुद्द आरोग्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही आरोग्यसेवा सुधारली नाही. त्यामुळे आता नूतन पालकमंत्री दिवाकर रावते हे तरी आरोग्य सेवा सुधारण्याच्या अनुषंगाने ठोस पाऊले उचलणार का? असा प्रश्न विचारला जावू लागला आहे.

Web Title: District Hospital 'Ventilator'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.