नातेवाईकांच्या आक्रोषाने हेलावले जिल्हा रूग्णालय
By Admin | Updated: August 11, 2014 01:52 IST2014-08-11T01:06:55+5:302014-08-11T01:52:58+5:30
उस्मानाबाद : दु:ख, वेदना आणि रडणाऱ्यांच्या आक्रोषाने जिल्हा रूग्णालयाचा परिसर ऐन राखीपौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी पुन्हा हेलावून गेला़

नातेवाईकांच्या आक्रोषाने हेलावले जिल्हा रूग्णालय
उस्मानाबाद : दु:ख, वेदना आणि रडणाऱ्यांच्या आक्रोषाने जिल्हा रूग्णालयाचा परिसर ऐन राखीपौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी पुन्हा हेलावून गेला़ प्रवेशद्वारापासून रूग्णालयाच्या मुख्य द्वारापर्यंत ठिकठिकाणी जमलेले पुरूष, महिला नातेवाईकांच्या निधनामुळे आक्रोष करीत होते़ एकाचा नव्हे तर तब्बल चार जणांचे मृतदेह रूग्णालयात आणण्यात आले होते़ त्यामुळे निर्माण झालेला आक्रोष ये-जा करणाऱ्या प्रत्येकाच्या ह्दयाला चटका लावून जात होते़
वाशी तहसील कार्यालयात अव्वल कारकून म्हणून काम करणारे अशोक गवळी हे शहरातील बीअॅण्डसी क्वॉर्टरमध्ये (क्ऱ दोन/६०) राहतात़ त्यांना दारूचे व्यसन असल्याने पत्नी मनिषा यांनी ऐन राखी पौर्णिमेदिनी दुपारच्या सुमारास राहत्या घरी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले़ त्यांचा मुलगा संतोष, त्याचा मित्र अक्षय ढोबळे व इतरांनी तातडीने मनिषा यांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ तोपर्यंत घरात असलेल्या अशोक गवळी यांनी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली़ ९१ टक्के होरपळलेल्या पत्नीची रूग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू असतानाच पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याने अवघा परिसर हेलावून गेला़ जिल्हा रूग्णालयात गवळी यांचा मुलगा संतोष व तेथे आलेले नातेवाईक एकच आक्रोष करीत होते़ तर गंभीररित्या भाजलेल्या बार्शी बाळू शिवाजी कांबळे (रा़रामेश्वर मंदिराजवळ कुर्डूवाडी रोड, बार्शी) या इसमास शुक्रवारी जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ त्याचाही रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला़
कळंब तालुक्यातील रत्नापूर येथील आदिनाथ नवनाथ भगत या इसमाचा विष पिल्याने मृत्यू झाला़ त्यास जिल्हा रूग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी मयत घोषित केले़ तर बार्शी तालुक्यातील भातंब्रा येथील ललिता सीताराम जगदाळे (वय-२५) या युवतीला विद्युत धक्का लागल्याने जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले होते़ तिस वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले़ काही मिनिटांच्या अंतराने चार मृतदेह जिल्हा रूग्णालयात दाखल झाले़ मयताच्या सोबत असलेल्या नातेवाईक महिला-पुरूष, वृध्दांसह युवकांनीही एकच हंबरडा फोडला होता़ नातेवाईकांच्या आक्रोषाने जिल्हा रूग्णालयात येणाऱ्या-जाणाऱ्यांचे ह्दय मात्र या घटनेने हेलावून गेले होते़ ऐन राखी पौर्णिमेदिनी या घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे़
(प्रतिनिधी)