जिल्हाध्यपदाची माळ आमदाराच्या गळ्यात
By Admin | Updated: January 12, 2016 23:44 IST2016-01-12T23:42:24+5:302016-01-12T23:44:10+5:30
हिंगोली : रडत-पडत, रखडत-अडखळत भाजप जिल्हाध्यक्षपदाची निवडप्रक्रिया सायंकाळी पाचच्या सुमारा पार पडली.

जिल्हाध्यपदाची माळ आमदाराच्या गळ्यात
हिंगोली : रडत-पडत, रखडत-अडखळत भाजप जिल्हाध्यक्षपदाची निवडप्रक्रिया सायंकाळी पाचच्या सुमारा पार पडली. अंतर्गत वाद वाढत गेले अन् त्याचा फायदा आमदार तान्हाजी मुटकुळे यांना झाला. अनपेक्षितपणे जिल्हाध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली.
कधी कार्यकर्ता शोधावा लागणाऱ्या या पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदासाठी तब्बल ४३ इच्छुकांनी अर्ज केला होता. त्यामुळे मुलाखती घेत असलेल्या निवडणूक अधिकारी मनोज पांगरकर यांना ही बाब प्रचंड अवघड जात होती. त्यात अनेकांना समजावले. तेव्हा माघारी घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले. तरीही १९ जण शर्यतीत उरले होते. त्यानंतर पुन्हा दुसरी फेरी सुरू झाली. यापैकी कुणीही ऐकायला तयार नव्हता. मात्र आमदार तान्हाजी मुटकुळे यांना जिल्हाध्यक्ष करीत असल्यास शिवदास बोड्डेवार, सुरजितसिंह ठाकूर, फुलाजी शिंदे, सूर्यभान ढेंगळे, उमेश गुट्टे, गोवर्धनअण्णा विरकुंवर, पी. आर. देशमुख यांनी माघारीची तयारी दर्शविली. मात्र इतर कुणी असल्यास आम्ही समोरील प्रक्रियेसाठी तयार असल्याचे सांगितले. दरम्यान, या प्रक्रियेबाबत पांडुरंग पाटील, श्रीकांत देशपांडे, अॅड.प्रभाकर भाकरे यांनी विरोध दर्शविला. त्यामुळे पांगरकरही गोंधळून गेले. शेवटी त्यांनी ही बैठक लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. कार्यकर्ते जिकडे-तिकडे जाण्याची तयारी सुरू झाली असतानाच दहा ते पंधरा मिनिटांनी पुन्हा बैठक बोलावली.
या बैठकीनंतर काही वेळातच आमदार तान्हाजी मुटकुळे यांचे नाव जिल्हाध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आले. या अनपेक्षित प्रकारामुळे अनेकांना धक्का बसला. खरेतर त्यांना हा निर्णय पचत नसला तरी चेहऱ्यावर उसने अवसान आणत त्यांनी घडल्या प्रकारातही आनंद मानला. काहींचा आनंद तर ‘... सवत रंडकी...’ या प्रकारात मोडणारा होता.
निवडीनंतर कार्यकर्त्यांनी आमदारांचे स्वागत केले. मावळते जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर, ब्रीजलाल खुराणा बी. डी. बांगर, के. के. शिंदे, शंकर बोरुडे, गणेश बांगर, मिलिंंद यंबल आदी मंचावर होते. तर सूर्यभान ढेंगळे, रामरतन शिंदे, संजय कावडे, संजय खंडेलवाल, रवीकुमार कान्हेड, उमेश नागरे आदी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)