जिल्ह्याला ११ कोटींचा फटका
By Admin | Updated: April 18, 2016 00:49 IST2016-04-18T00:47:28+5:302016-04-18T00:49:59+5:30
परभणी : यावर्षी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा फटका महसूल प्रशासनाला बसला आहे़ तब्बल ११ कोटी रुपयांचा महसूल घटला

जिल्ह्याला ११ कोटींचा फटका
परभणी : यावर्षी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा फटका महसूल प्रशासनाला बसला आहे़ तब्बल ११ कोटी रुपयांचा महसूल घटला असून, महसुली उद्दिष्ट केवळ ५८ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे़ त्यामुळे आगामी काळात विकास कामांवरही परिणाम होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत़
जिल्हा प्रशासनाच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातील विविध संस्था आणि गौण खनिजाच्या माध्यमातून कर वसूल केला जातो़ जिल्ह्यातून वसूल झालेला हा कर जिल्ह्याच्याच विकास कामांसाठी वापरला जातो़ तीन वर्षांपासून परभणी जिल्हा दुष्काळाचा सामना करीत आहे़ पावसाचे प्रमाण घटल्याने त्याचा दुष्परिणाम थेट कृषी क्षेत्राला बसला़ जिल्ह्यातील कृषीक्षेत्र तीन वर्षांपासून नुकसानीचा सामना करीत आहे़ परभणी जिल्हा हा कृषीप्रधान जिल्हा म्हणून गणला जातो़ येथील अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे़ त्यामुळे कृषीक्षेत्रातील उलाढालींचा परिणाम अन्य व्यवसायांवर दिसून येतो़ दोन वर्षांपासून तग धरून असलेले अनेक व्यवसाय यावर्षी मात्र ठप्प पडले आहेत़ दुष्काळाचा फटका अन्य व्यवसायांना बसत असतानाच जिल्हा प्रशासन देखील या परिस्थितीच्या कचाट्यात अडकले आहे़ जिल्हा प्रशासनाकडून विविध स्वरुपाचा महसूल दरवर्षी वसूल केला जातो़ २०१५-१६ या वर्षासाठी परभणी जिल्हा प्रशासनाला ५० कोटी ४० लाख रुपयांचे वसुलीचे उद्दिष्ट दिले होते़ विभागीय आयुक्त कार्यालयाकडून दिले जाणारे हे उद्दिष्ट प्रशासन दरवर्षी पूर्ण करते़ यावर्षी देखील महसूल प्रशासनाने हे उद्दिष्ट गाठण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले़ मात्र दुष्काळाच्या संकटापुढे प्रशासनाची वसुली ५८ टक्क्यांच्या आसपास पोहोचू शकली नाही़ मार्च अखेर जिल्हा प्रशासनाने दिलेल्या उद्दिष्टांच्या तुलनेत २९ कोटी ३३ लाख ५९ हजार रुपये महसूल वसूल केला आहे़ त्यामुळे यावर्षी वसुलीत मोठी घट झाली़ तब्बल ११ कोटी १७ लाख रुपये वसुली अजूनही ठप्प पडलेली आहे़ यावर्षीच्या महसुली वसुलीत मोठी घट झाल्याने जिल्ह्याच्या तिजोरीत अत्यल्प स्वरुपात महसूल जमा झाला असून, त्याचा परिणाम आगामी काळातील विकास कामांवरही होण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ मार्चअखेरपर्यंत झालेल्या महसूल वसुलीची माहिती मागविण्याचे काम अजूनही जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे़ त्यामुळे ३१ मार्चअखेर झालेल्या महसुली वसुलीत काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)