टंचाई निवारणासाठी जिल्ह्याला मिळाले सव्वासहा कोटी
By Admin | Updated: March 23, 2016 00:24 IST2016-03-23T00:22:46+5:302016-03-23T00:24:14+5:30
परभणी : जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने ६ कोटी २५ लाख १ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला

टंचाई निवारणासाठी जिल्ह्याला मिळाले सव्वासहा कोटी
परभणी : जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने ६ कोटी २५ लाख १ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली़
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ़ बाबाजानी दुर्राणी, आ़ सतीश चव्हाण यांनी या संदर्भात तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता़ त्यामध्ये २०१५-१६ या वित्तीय वर्षात परभणी जिल्ह्यास विहीर/बोअर अधिग्रहण, टँकर, नळयोजना विशेष दुरुस्ती, तात्पुरती पुरक नळ योजना तसेच नवीन विंधन विहिरी या उपाययोजनांकरीता काय तयारी करण्यात आली आहे? तालुकानिहाय निधी किती देण्यात आला आहे? या बाबींचा समावेश होता़ त्यावर बोलताना पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी परभणी जिल्ह्याला ६ कोटी २५ लाख १ हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे़ त्यामध्ये परभणी तालुक्यासाठी ८१ लाख ८४ हजार, पूर्णा तालुक्यासाठी ५४ लाख ५२ हजार, पालम तालुक्यासाठी १ कोटी ७ लाख ५० हजार, गंगाखेड तालुक्यासाठी ७५ लाख २६ हजार, पाथरी तालुक्यासाठी ५७ लाख ६३ हजार, सोनपेठ तालुक्यासाठी ६६ लाख १९ हजार, मानवत तालुक्यासाठी ४० लाख ७८ हजार तर सेलू तालुक्यासाठी ७१ लाख ५९ हजार आणि जिंतूर तालुक्यासाठी ६९ लाख ७० हजार रुपयांचा निधी देण्यात आला असल्याचे लोणीकर म्हणाले़ (जिल्हा प्रतिनिधी)