जिल्हाधिकाऱ्यांच्या मोबाईल सेवेचा फज्जा
By Admin | Updated: May 18, 2017 00:19 IST2017-05-18T00:12:40+5:302017-05-18T00:19:23+5:30
लातूर : ‘मी दौऱ्यावर असलो, आपली भेट होऊ शकली नाही तर मोबाईल नंबरवर संपर्क साधा, असा फलक नूतन जिल्हाधिकारी जी़ श्रीकांत यांनी दालनाबाहेर लावला आहे़ मात्र पहिल्याच दिवशी या सेवेचा फज्जा उडाला

जिल्हाधिकाऱ्यांच्या मोबाईल सेवेचा फज्जा
दत्ता थोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : ‘मी दौऱ्यावर असलो, आपली भेट होऊ शकली नाही तर थेट ९९२१०४४४६६ या मोबाईल नंबरवर संपर्क साधा, असा मोठा फलक नूतन जिल्हाधिकारी जी़ श्रीकांत यांनी दालनाबाहेर लावला आहे़ मात्र पहिल्याच दिवशी या सेवेचा फज्जा उडाला असून, ‘लोकमत’ने १२ वेळा वेगवेगळ्या नंबरवरून कॉल केला व एक वेळा संदेश पाठवून सेवेची सतर्कता जाणून घेण्याचा प्रयत्न केला़ मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून कुठलाही प्रतिसाद मिळू शकला नाही़ स्वत:हून सार्वजनिक केलेल्या मोबाईल सेवेचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाला़
जिल्हाधिकारी जी़श्रीकांत बुधवारी शहरात होते़ जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या दालनात ३़३० पर्यंत असल्याचे त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी सांगितले़ ४ नंतर मात्र ते कार्यालयात नव्हते़ दौऱ्यावर असतील असे समजून, ‘लोकमत’ने त्यांनी जनतेसाठी खुल्या केलेल्या मोबाईल नंबरवर कॉल केला़ मात्र त्यांच्याकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही़ ‘लोकमत’चा प्रतिनिधी असल्याचा मॅसेजही पाठविण्यात आला़ मात्र नूतन जिल्हाधिकारी जी़ श्रीकांत यांच्याकडून या संदेशालाही प्रतिसाद मिळाला नाही़ विशेष म्हणजे त्यांनी लातूर जिल्हाधिकारी म्हणून पदभार घेतल्यानंतर आपल्या दालनाच्या बाहेर मोठा फलक लावला आहे़ या फलकावर ‘मी दौऱ्यावर असल्यास, आपली भेट न झाल्यास थेट ९९२१०४४४६६ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा़ निवेदन द्यायचे असेल तर याच मोबाईल नंबरच्या व्हॉट्सअॅपवर टाकावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे़ त्यामुळे ‘लोकमत’ने जिल्हाधिकाऱ्यांच्या या उपक्रमाचे कौतूक केले़ ‘असा सेवा देणारा लातूरचा पहिला जिल्हाधिकारी असल्याची बातमी प्रसिद्ध केली़’ मात्र ‘लोकमत’ प्रतिनिधींनी ९९२२९३०२०८, ९४२१५९८९९२, ८६६८७६९८२७, ९०४९०७२७७८, ९७६५६६०१०७ या क्रमांकांच्या मोबाईलवरून जिल्हाधिकारी जी़ श्रीकांत यांच्याशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़ वारंवार रिंग दिली़ १२ वेळा कॉल केला़ परंतु, जिल्हाधिकाऱ्यांकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही़ त्यांच्या या सार्वजनिक सेवेचा फज्जाच दिसला़
विशेष म्हणजे यापूर्वीचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी आपला मोबाईल नंबर सार्वजनिक केला नसला तरी त्यांच्या मोबाईलवर रिंग गेल्यानंतर किंवा ते कामात व्यस्त असल्यामुळे मोबाईल उचलू शकले नसले तर त्यांचा मॅसेज किंवा प्रतिकॉल यायचा़ याचा त्यांनी गवगवाही केला नाही़ पण कामाची व्यस्तता संपल्यास प्रतिकॉल नक्की यायचा़
मात्र नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी आपला मोबाईल स्वत:हून सार्वजनिक करून तो उचलला नाही की प्रतिकॉल केला नाही़ त्यामुळे हा त्यांचा स्टंट आहे, की ते खरेच कामात होते, याचे उत्तर त्यांनी मोबाईल न उचलल्यामुळे जाणून घेता आले नाही़ जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर लावलेल्या सूचना फलकावरील त्यांचा मोबाईल नंबर सेव्ह करण्यासाठी बुधवारीही कार्यालयाबाहेर नागरिक दिसले़