जिल्हा कचेरीला लावले टाळे
By Admin | Updated: June 6, 2017 23:51 IST2017-06-06T23:49:37+5:302017-06-06T23:51:14+5:30
परभणी : शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावले

जिल्हा कचेरीला लावले टाळे
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त झुगारुन आंदोलक शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावले व आपल्या भावना प्रशासनासमोर मांडल्या़
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, या प्रमुख मागणीसाठी किसान क्रांती समन्वय समितीने जिल्ह्यात सहा दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यानंतर मंगळवारी शासकीय कार्यालयांना कुलूप ठोकून शेतकऱ्यांच्या भावना प्रशासन व शासनापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. नियोजनानुसार सकाळी ११.३० च्या सुमारास शेतकरी आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. मुख्य प्रवेशद्वारासमोर बंदोबस्त असल्याने काही वेळ हे आंदोलक याच परिसरात ठाण मांडून बसले.
त्यानंतर सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास प्रवेशद्वाराजवळ जाऊन काहींनी लोखंडी गेट ओढून घेत त्या गेटला कुलूप टाकण्याचा प्रयत्न केला. गेटला कुलूप लागलेही परंतु लगेच पोलीस कर्मचाऱ्यांनी हे कुलूप काढून घेतले.
या प्रकारानंतर जिल्हाधिकारी पी.शिवा शंकर यांच्याशी आंदोलकांनी चर्चा केली. शासनाने ४८ तासात कर्जमाफी जाहीर करावी, अशी आमची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या भावना आपल्या मार्फत शासनाला कळवाव्यात. अन्यथा यापुढे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर यांना आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनावर विलास बाबर, गणेश घाटगे, चंद्रकांत पाथरकर, रामेश्वर आवरगंड, अशोक कांबळे, तुकाराम खिल्लारे, भीमराव मोगले, मुंजाजी तारडे, दिनकर गरुड, शिवाजी कदम, विजय ठेंगे, विष्णू मोगले, अण्णासाहेब गव्हाणे आदींची नावे आहेत़