जिल्हा प्रशासन गाळ काढणार
By Admin | Updated: November 14, 2014 00:53 IST2014-11-14T00:29:45+5:302014-11-14T00:53:13+5:30
जालना : जिल्ह्यातील कोरडेठाक पडलेल्या लघू व मध्यम सिंचन प्रकल्पातील गाळ काढण्याकरीता जिल्हा प्रशासनाद्वारे विविध विभाग व संस्था,

जिल्हा प्रशासन गाळ काढणार
जालना : जिल्ह्यातील कोरडेठाक पडलेल्या लघू व मध्यम सिंचन प्रकल्पातील गाळ काढण्याकरीता जिल्हा प्रशासनाद्वारे विविध विभाग व संस्था, संघटनांच्या सहकार्याने मोठी मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा दुष्काळी स्थिती अनुभवत आहे. याही वर्षी अल्पशा पावसाने संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळी सदृश्य स्थिती गंभीर बनली आहे. विशेषत: खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून रबी पेरण्याही खोळंबल्या आहेत, असे जिल्हाधिकारी नायक यांनी नमूद केले.
जमिनीतील पाणी पातळी खोलवर गेल्यामुळेच टंचाईचे संकट उभे राहिल, अशी चिन्हे दिसत असल्याचे स्पष्ट करीत जिल्हाधिकारी नायक यांनी जानेवारीपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा असल्याचे ते म्हणाले. उन्हाळ्याच्या तीनचार महिन्यात टंचाई जाणवेल, असा अंदाज व्यक्त करीत नायक यांनी टंचाई निवारणाच्या उपाययोजना अंमलात आणल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला. दोन वर्षांपूर्वी कोरड्याठाक पडलेल्या प्रकल्पातील गाळ काढण्याकरीता मोहीम राबविण्यात आली. याही वर्षी गाळ काढणीकरता युद्धपातळीवर लोकसहभागातून मोठी मोहीम राबविली जाईल, अशी माहिती दिली. प्रशासनाने सर्व विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अन्य संस्था व संघटनांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी करण्याचे ठरविल्याचे नायक यांनी म्हटले. रोहयोतूनकाही लघू प्रकल्पातील गाळ अकुशल मजुरांद्वारे काढला जाणार आहेत. मोठ्या प्रकल्पातून गाळ काढण्याकरीता मशिनरींचाच वापर करावा लागणार आहे. त्यामुळे आवश्यक ती मशिनरी उपलब्ध करून दिली जाईल व प्रत्येक तालुक्यात या मोहिमेस लोकचळवळीचे स्वरूप यावे, म्हणून सर्वार्थांने प्रयत्न केले जातील.४
संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यात वैरण विकासाचा एक अभिनव प्रयोग राबविला जाणार असल्याचे नायक यांनी म्हटले. विशेषत: प्रकल्प परिसरात गाळ पेरणीतून चारा उत्पादनावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. घाणेवाडी, पीरकल्याण तसेच बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पाच्या परिसरात वैरण विकासाचा कार्यक्रम युद्धपातळीवर घेतला जाणार असल्याचे स्पष्ट करीत त्याअनुषंगाने नियोजनही करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
सलमान खान फाऊंडेशन, जिल्हा नियोजन समिती व उद्योजकांकडून ग्रामीण भागात गेल्यावर्षी दिलेल्या पाण्याच्या टाक्या जमा केल्या जाणार असून त्या टाक्यांचा पिण्याच्या पाण्यासाठी वापर केला जाणार असल्याचे नायक यांनी म्हटले.
४लोअर दुधना व जुई धरणातील पाणीसाठ्याचा टंचाईच्या या पार्श्वभूमीवर मोठा उपयोग घेता येईल, असा विश्वास नायक यांनी व्यक्त केला. परतूर व मंठा या दोन तालुक्यांसह घनसावंगी तालुक्यातील काही गावांना टँकरद्वारे पाणी पुरविण्यासाठी लोअर दुधना प्रकल्प टँकर पॉईन्ट ठरविता येईल. तसेच जुईतूनही जाफराबाद व भोकरदन तालुक्यातील गावांना टँकरद्वारे पाणी देता येईल, असे ते म्हणाले. यासंबंधीचे नियोजन करण्यात येत असून त्यादृष्टीने संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.