जिल्ह्यात १०८ टँकर सुरू
By Admin | Updated: May 9, 2015 00:53 IST2015-05-09T00:42:07+5:302015-05-09T00:53:12+5:30
उस्मानाबाद : दिवसेंदिवस टंचाईच्या झळा तीव्र होवू लागल्या आहेत. त्याच गतीने टँकर आणि अधिग्रहणाची संख्याही वाढत आहे.

जिल्ह्यात १०८ टँकर सुरू
उस्मानाबाद : दिवसेंदिवस टंचाईच्या झळा तीव्र होवू लागल्या आहेत. त्याच गतीने टँकर आणि अधिग्रहणाची संख्याही वाढत आहे. जिल्ह्यातील ८३ गावातील सुमारे १ लाख ८१ हजार ६६१ लोकांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच २७९ गावांमध्ये विहीर, कुपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
जिल्ह्यात मागील ३ ते ४ वर्षापासून सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. गतवर्षीही सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात पाण्याची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. परिणामी टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत दिवसागणिक भर पडू लागली आहे. उस्मानाबाद, भूम आणि कळंब या तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न तीव्र बनला आहे. ५० टक्क्यावर टँकर या तीन तालुक्यात सुरु आहेत. जिल्ह्यातील ८० गावे आणि ३ वाड्यांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील १७ गावांना २० टँकर, तुळजापूर ५ गावांना १०, उमरगा १० गावांना १३, लोहारा १ गावास ६, कळंब २० गावांना २६, भूम १७ गावांना २२, वाशी ६ गावांना ७ तर परंडा तालुक्यातील ४ गावांमध्ये ४ टँकर सुरु आहेत. दरम्यान, टँकरप्रमाणेच अधिग्रहणाची संख्याही त्याच गतीने वाढत आहे. जिल्ह्यातील २७९ गावांमध्ये ५६१ जलस्त्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये टँकरसाठी ९६ तर टॅकर व्यतिरिक्त ४६५ अधिग्रहणाचा समावेश आहे. टंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होवू लागल्या आहेत. त्यामुळे अधिग्रहणे वाढत आहेत. (प्रतिनिधी)