आठ नगरपालिकांना २३ कोटी वितरित
By Admin | Updated: October 15, 2016 01:17 IST2016-10-15T01:02:00+5:302016-10-15T01:17:52+5:30
परभणी : जिल्ह्यातील सात नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी नोव्हेंबर महिन्यात मतदान होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्ह्यातील सात नगरपालिका

आठ नगरपालिकांना २३ कोटी वितरित
परभणी : जिल्ह्यातील सात नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी नोव्हेंबर महिन्यात मतदान होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्ह्यातील सात नगरपालिका व एका नगरपंचायतीला २०१६-१७ या आर्थिक वर्षात एकूण २३ कोटी १३ लाख ८८ हजार ५५२ रुपयांचा निधी वितरित केला आहे.
राज्यातील नगरपालिकांसाठी नोव्हेंबर महिन्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झाली असून यावेळी थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने यावेळेसच्या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक राजकीय पक्षाकडून नगराध्यक्षपद मिळविण्यासाठी खटाटोप केला जात आहे. त्यामध्ये सत्ताधारी व विरोधी पक्षांचा समावेश आहे. नगरपालिकेत सत्ता कोणत्याही पक्षाची असली तरी राज्यशासनाने मात्र जिल्ह्यातील नगरपालिकांना निधी देताना समानतेचे धोरण ठेवल्याचेच दिसून येत आहे.
२०१६-१७ या आर्थिक वर्षात शासनाने जिल्ह्यातील ७ नगरपालिका व एका नगरपंचायतीला एकूण २३ कोटी २ लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्यामध्ये नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत गंगाखेड नगरपालिकेला २५ लाख रुपये, सेलू नगरपालिकेला १ कोटी १० लाख रुपये, जिंतूर पालिकेला २५ लाख रुपये, मानवतला ७५ लाख रुपये, सोनपेठ नगरपालिकेला १ कोटी ५० लाख रुपये, पूर्णा नगरपालिकेला २ कोटी ७२ लाख रुपये तर पालम नगरपंचायतीला १ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तातडीच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जिंतूर व सेलू वगळता गंगाखेडला १२ लाख ८२ हजार ६५५ रुपये, मानवतला १३ लाख ५६ हजार २२० रुपये, पाथरीला १२ लाख ७२ हजार रुपये, सोनपेठला १४ लाख २३ हजार ९५५ रुपये, पूर्णा पालिकेला १३ लाख ३७ हजार ७०० रुपये आणि पालमला १५ लाख १६ हजार २२ रुपये वितरित करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील चार नगरपालिकांना शासनाने विशेष रस्ता अनुदान दिले आहे. त्यामध्ये गंगाखेड, सेलू, पाथरी व सोनपेठ या चार पालिकांना प्रत्येकी २ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. तसेच वैैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत तीन पालिकांना निधी देण्यात आला आहे. त्यामध्ये मानवत नगरपालिकेला ३ कोटी रुपये, गंगाखेड नगरपालिकेला २ कोटी रुपये तर सोनपेठ पालिकेला १ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.