जीवन गौरव पुरस्काराने कुलगुरू सन्मानित
By Admin | Updated: July 18, 2016 01:11 IST2016-07-18T00:46:04+5:302016-07-18T01:11:37+5:30
‘एनआयसीईआर’ या राष्ट्रीय संस्थेने दिल्ली येथे एका कार्यक्रमात कुलगुरूडॉ. बी. ए. चोपडे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले.

जीवन गौरव पुरस्काराने कुलगुरू सन्मानित
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ‘स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत’ उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ‘एनआयसीईआर’ या राष्ट्रीय संस्थेने दिल्ली येथे एका कार्यक्रमात कुलगुरूडॉ. बी. ए. चोपडे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले.
‘नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ क्लीनलिनेस एज्युकेशन अॅण्ड रिसर्च’चे संपादक उत्कर्ष शर्मा यांनी ‘वर्ल्ड युथ स्कील्स डे’ निमित्त या पुरस्काराची घोषणा केली. ‘एनआयसीईआर’ ही राष्ट्रीय स्तरावरील संस्था आहे. या संस्थेच्या वतीने १५ जुलै रोजी ‘युनायटेड नेशन्स वर्ल्ड युथ स्कील्स’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमात बल्गेरियाचे राजदूत पेटको डॉयकोव्ह, इंडोनेशियाचे राजदूत मोझेस टँडंग लेलाटिंग, इंदिरा गांधी तंत्रज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पी. आर. त्रिवेदी आदींच्या हस्ते कुलगुरूडॉ. चोपडे यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ. चोपडे यांनी गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात जलयुक्त विद्यापीठ, स्वच्छता मोहीम यामध्ये केलेल्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. रासेयो समन्वयक डॉ. राजेश करपे यांनी या मोहिमेत योगदान दिले आहे.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ‘नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ क्लीनलिनेस एज्युकेशन अॅण्ड रिसर्च’ या दोन्ही संस्थांमध्ये सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या अंतर्गत स्वच्छतेसंदर्भात विविध अभ्यासक्रम प्रशिक्षण, कार्यक्षमता, जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. चोपडे यांनी दिली.