डासमुक्तीचा पॅटर्न सातासमुद्रापार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2016 00:04 IST2016-02-26T23:58:19+5:302016-02-27T00:04:11+5:30
नांदेड : डासमुक्तीचा नांदेड पॅटर्न राज्यात यापूर्वीच लागू झाला असून आता याची ख्याती सातासमुद्रापार पोहोचली आहे़

डासमुक्तीचा पॅटर्न सातासमुद्रापार
नांदेड : डासमुक्तीचा नांदेड पॅटर्न राज्यात यापूर्वीच लागू झाला असून आता याची ख्याती सातासमुद्रापार पोहोचली आहे़ मुंबई येथे २२ फेब्रुवारी रोजी पर्यावरणातील बदल व त्याचा सामाजिक आरोग्यावर होणारा परिणाम या विषयावर झालेल्या कार्यशाळेत डासमुक्ती अभियानाचे नांदेड जिल्हा परिषदेने सादरीकरण केले़
वॉशिंग्टन येथील पर्यावरण अभ्यास केंद्राचे संचालक डॉ़ जॉन बल्बस व आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक, युनिसेफच्या प्रमुख राजेश्वरी चंद्रशेखर, राजलक्ष्मी अय्यर, डॉ़ पाडके, युसूफ कबीर आदींची उपस्थिती होती़ सादरीकरणात नांदेड जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या डासमुक्त गाव अभियानात करण्यात आलेल्या उपक्रमाची आरोग्य अधिकारी डॉ़बालाजी शिंदे यांनी माहिती दिली़ यात आजारातून होणाऱ्या खर्चात बचत, भूगर्भातील पाणीपातळीत वाढ, वृक्षलागवड तसेच गावस्तरावरील गटारांवर होणारा प्रशासनाचा खर्च कमी झाला आहे़ याविषयी कार्यशाळेत चर्चा करण्यात आली़
सुजाता सौनिक म्हणाल्या, दूषित पाण्यामुळे तसेच डासांपासून होणाऱ्या आजारांवर ग्रामीण भागातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात खर्च होतो़ हा खर्च टाळण्यासाठी शोषखड्ड्यांमुळे होणारे डासमुक्त गाव हा उत्तम पर्याय ठरत आहे़ याचा आरोग्यमानावर होणारा परिणाम पाहण्यासाठी किमान दोन ते तीन वर्षांचा अभ्यास करणे आवश्यक आहे़ मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील जवळपास १०० गावे डासमुक्त झाली आहेत़ १३०९ ग्रामपंचायतींमधून शोषखड्ड्याची कामे सुरु असून टप्प्याटप्प्याने संपूर्ण जिल्हा डासमुक्त करण्यात येणार आहे़ त्याचबरोबर संपूर्ण ग्रामपंचायतींमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आरो बसविण्यात येणार आहेत, असेही डॉ़ शिंदे म्हणाले़