शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ
By Admin | Updated: June 22, 2015 00:18 IST2015-06-21T23:36:14+5:302015-06-22T00:18:56+5:30
आव्हाना : भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील केंद्रीय प्राथमिक शाळेतून केंद्रांतर्गत पुस्तक वाटप करण्यात आले. मात्र, त्यामध्ये शासन

शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ
आव्हाना : भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील केंद्रीय प्राथमिक शाळेतून केंद्रांतर्गत पुस्तक वाटप करण्यात आले. मात्र, त्यामध्ये शासन निर्देशानुसार संख्येनुसार शाळांना पुस्तके पुरविण्यात न आल्यामुळे बरेच विद्यार्थी पुस्तकांपासून वर्षभर वंचित राहणार असे चिन्ह दिसत आहे.
केंद्रीय प्राथमिक शाळा अंतर्गत श्री आत्मानंद विद्यालय ही शाळा असून, या शाळेस एकूण विद्यार्थ्यांपैकी ५० टक्के पुस्तके मिळाल्याबाबत माहिती मुख्याध्यापक एम.एस. तुपे यांनी दिली. मागील वर्षीही इयत्ता आठवी वर्गास शासनाच्या वतीने मोफत पुस्तक देण्यात आली नसल्याची बाब उघड झाली आहे. अनेक विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित होते. याविषयी मुख्याध्यापकाने वारंवार पत्रव्यवहार केल्याचेही सांगितले. मागील वर्षाची पुनरावृत्ती होणार की काय यामुळे सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक हे चिंतेत आहे. शाळेस युडायएसनुसार पुस्तक न देता काही शाळांना कमी तर काही शाळांना जास्त, काही ठिकाणी एखादा विषय पुस्तकेच नाही तर काही ठिकाणी एकाच विषयाचे डबल पुस्तके. आत्मानंद विभागाचे पुस्तकपेढी विभाग प्रमुख ए.आर. गावंडे यांना या विषयी विचारणा केली असता केंद्रीय शाळेतून आम्हाला कमी पुस्तके देवून माझी सही जास्त पुस्तक संख्येवर घेतल्याबाबत सांगितले.
कमी पुस्तके प्रत्यक्ष शाळेस देवून जास्त संख्येवर सही घेत असल्याबाबत ही गावंडे यांनी सांगितले. तर शासन पुरवठामधील मोफत पुस्तके जातात कुठे, मोफत पाठ्यपुस्तके केंद्रीय शाळेवर येतात व सर्व जि.प. शाळांना पुस्तके वाटप झाल्यावर शिल्लक राहील तरच खाजगी संस्थेला पुस्तके पुरविले जातात काय, अशी ही चर्चा मुख्याध्यापक तुपे यांनी बोलताना केली. या विषयी केंद्रीय मुख्याध्यापक सोळुंके यांना विचारणा केली असता आम्ही पुस्तके बरोबरच दिली आहे, अशी बतावणी करत आहे. या शिक्षण विभागाच्या सावळागोंधळामुळे मागीलवर्षी वर्षभर वंचित राहिलेले विद्यार्थी याहीवर्षी वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. (वार्ताहर)