ग्रा.पं. निवडणूक प्रक्रियेत वीज खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:58 IST2017-10-06T00:58:02+5:302017-10-06T00:58:02+5:30
रामपंचायतीच्या प्रशासकीय निवडणूक कामादरम्यान वारंवार विद्युत पुरवठा खंडित झाल्याने महावितरणच्या अभियंत्यावर निवडणूक कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करावा, असे पत्र तहसीलदार महेश सावंत यांनी पैठण पोलीस ठाण्यात दिले आहे.

ग्रा.पं. निवडणूक प्रक्रियेत वीज खंडित
लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय निवडणूक कामादरम्यान वारंवार विद्युत पुरवठा खंडित झाल्याने महावितरणच्या अभियंत्यावर निवडणूक कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करावा, असे पत्र तहसीलदार महेश सावंत यांनी पैठण पोलीस ठाण्यात दिले आहे.
दरम्यान, याबाबत तहसीलदारांनी स्वत: ठाण्यात येऊन फिर्याद द्यावी, अशी सूचना पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी तहसीलदारांना दिली असून रात्री उशिरापर्यंत तहसीलदार सावंत पोलीस ठाण्यात न आल्याने गुन्हा दाखल झालेला नव्हता. या प्रकाराने महसूल व महावितरण या दोन विभागात चांगलीच जुंपल्याची चर्चा होत आहे. तहसीलदारांच्या पत्रात म्हटले आहे की, पैठण येथील सहायक अभियंत्यांना तालुक्यात २२ ग्रामपंचायतीच्या निवडणूका सुरू असून प्रशासकीय तयारी करण्यात येत असल्याने पैठण तहसील कार्यालयाचा विद्युत पुरवठा सुरळीतपणे चालू ठेवावा अशा सूचना व लेखी पत्र देऊन कळविण्यात आल्या; परंतु त्यांनी या कामात हलगर्जीपणा व टाळाटाळ केली. या प्रकाराने निवडणूक कामात अडथळा आला आहे. निवडणूक आयोगानेही निवडणूक काळात विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत महावितरणला निर्देशित केले आहे. ४ रोजी विद्युत पुरवठा खंडित झाल्याने ईव्हीएम मशिन शिलिंग प्रक्रिया रात्री २.३० पर्यंत करावी लागली. यामुळे निवडणूक कामात मोठा अडथळा निर्माण झाला. ५ रोजी दुपारनंतर विद्युत पुरवठा खंडित झाल्याने कुठलेही आदेश निर्गमित करता आले नाही, असे सावंत यांनी पत्रात नमूद केले आहे. यामुळे महावितरणच्या संबंधित अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रात केली आहे. आता काय कारवाई होते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.