धनादेशाचा अनादर; तीन जणांना कैद
By Admin | Updated: January 3, 2017 23:26 IST2017-01-03T23:23:47+5:302017-01-03T23:26:03+5:30
कळंब : धनादेश न वटल्याप्रकरणी तिघा जणांना कळंब न्यायालयाने जवळपास सात लाखाचा दंड व कैदेची शिक्षा सुनावली़

धनादेशाचा अनादर; तीन जणांना कैद
कळंब : तालुक्यातील हावरगाव येथील शंभू महादेव साखर कारखान्याकडून ऊस तोडणी व वाहतूक ठेक्यासाठी घेतलेली उचल रक्कमेचा परतावा म्हणून कारखान्याला दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी तिघा जणांना कळंब न्यायालयाने जवळपास सात लाखाचा दंड व कैदेची शिक्षा सुनावली़
शंभू महादेव कारखान्यासाठी ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदार म्हणून काम करण्यासाठी गोरख चित्राव (रा़ भडाचीवाडी), नामदेव उत्तम रणखांब (रा़ कुमाळवाडी) व मधुकर विठ्ठल पाटील (रा़ चिंचोली) या तिघांनी गळीत हंगाम सन २००८-०९ मध्ये कारखान्यासोबत करार केला होता़ यासाठी तिघांनी अनुक्रमे ६ लाख १२ हजार ६७६ रूपये, ३ लाख ९५ हजार ४९१ रूपये व २ लाख ३९ हजार १५० रूपयांची उचल घेतली होती़ गळीत हंगाम संपल्यानंतर त्यांच्याकडे अनुक्रमे ३ लाख ७७ हजार १४६, १ लाख ६० हजार ७२३ व १ लाख ४७ हजार ७९८ रूपये बाकी राहिली होती़ यासाठी तिघांनी उपरोक्त रक्कमेचे धनादेश कारखान्याकडे दिले होते़ परंतू त्यांच्या खात्यावर पुरेशा रक्कमा नसल्याने धनादेशाचा अनादर झाला़ तसेच त्यांनी त्यांच्याकडील येणे असलेली रक्कमही कारखान्यास दिली नाही़ यामुळे कारखान्याच्या वतीने दादासाहेब खराटे यांनी अॅड़ व्हीक़े़माने यांच्या मार्फत कळंब येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात प्रकरणे दाखल केली होती़ या प्रकरणाच्या सुनावणीनंतर समोर आलेले पुरावे, अॅड़ व्हीक़े़माने यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश एस़एस़उबाळे यांनी गोरख चित्राव यास ४ लाख रूपयांचा दंड व एक वर्षाची साधी कैद, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, नामदेव रणखांब यास एक लाख ७५ हजार रूपये दंड व सहा महिने साधी कैद व दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद, तसेच मधुकर पाटील यास एक लाख ६० हजार रूपये दंड व सहा महिने साधी कैद, दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावल्याचे अॅड माने म्हणले.