वनपरिक्षेत्राचा वाद; वृक्षतोड जोमात
By Admin | Updated: July 7, 2014 00:09 IST2014-07-06T23:12:26+5:302014-07-07T00:09:47+5:30
विलास भोसले , पाटोदा तालुक्यातील वनपरिक्षेत्राच्या जमिनीबाबत वन विभागातच वाद आहे. जमीन नेमकी कोणाची, असा प्रश्न आहे.

वनपरिक्षेत्राचा वाद; वृक्षतोड जोमात
विलास भोसले , पाटोदा
तालुक्यातील वनपरिक्षेत्राच्या जमिनीबाबत वन विभागातच वाद आहे. जमीन नेमकी कोणाची, असा प्रश्न आहे. वनविभागात अशी परिस्थिती असताना वनपरिक्षेत्रात मात्र जोमात वृक्षतोड सुरू आहे. यामुळे पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पाटोदा वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत २ हजार ७११ हेक्टर वन जमीन आहे. सौताडा येथील ८२ हेक्टर क्षेत्र बीट पुनर्रचनेच्या नावाखाली २००९ मध्ये आष्टी कार्यालयातील मातकुळी बीटला जोडले आहे. या जमिनीचा गट क्र. ३२६ व ३९२ आहे. येथे कागदोपत्री ८२ हेक्टर जमीन दाखविण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र ही जमीन ६२ हेक्टरच असल्याचे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले. मग उर्वरित जमीन गेली कोठे? असा प्रश्न निर्माण होत आहे.
पाटोदा तालुक्यांतर्गत शिरूर तालुक्याचा कारभार चालतो. या तालुक्यातील ग. क्र. ५१ व ९६ हे झापेवाडी शिवारात आहेत. झापेवाडी हे क्षेत्र बीड, शिरूर व पाथर्डी राज्य महामार्गावर असल्याने यावर अनेकांचा डोळा आहे. येथील २०० हेक्टर वन जमीन क्षेत्रासंबंधीही वाद सुरू असल्याचे वन विभागातून सांगण्यात आले. राज्य शासनाच्या गॅझेटमध्ये हे क्षेत्र वन विभागाचे आहे. महसूल प्रशासनाने मात्र जमिनीची नोंद सातबाऱ्यावर मालकी हक्कात ‘महाराष्ट्र शासन वन विभाग’ अशी नोंद करणे आवश्यक असताना हे क्षेत्र ‘फॉरेस्ट’ अशी नोंद केलेली आहे. त्यामुळे मालकी हक्काच्या या नोंदीवरूनही संभ्रम निर्माण होत आहे.
अशा परिस्थितीच राज्य शासनाने या जमिनीवर पाटोदा तहसील कार्यालयाची इमारती उभारली आहे. शिवाय क्रीडा संकुलासाठी १ हेक्टर जमिनीचे आरक्षण केले आहे. तर, काही भूखंड खाजगी लोकांना वितरित केले आहेत. उर्वरित काही जमिनीवर इतर शासकीय कार्यालये उभारण्याचा प्रशासनाचा मानस आहे. त्या-त्या भूखंडावर आपले कार्यालय होणार? अशा गप्पाही अधिकारी-कर्मचारी खासगीत करीत असल्याचेही दिसून येत आहे. एकंदरच, तालुक्यातील वन विभागाच्या जमिनीबाबत असा वाद सुरू आहे. याचा गैरफायदा काही अनधिकृत व्यक्ती घेत आहेत. वनविभागाच्या जमिनीवर सर्रास वृक्षतोड होताना कारवाई कोणी करावी याचाही संभ्रम आहे. वन परिक्षेत्रातील जमिनीवरील वृक्ष रात्रीच तोडून ते परस्पर विक्री होत असल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी जाधव, अनिल जायभाये यांनी केला आहे.
वनपरिक्षेत्राजवळ काही शेतकऱ्यांचीही जमीन आहे. त्यामुळे काही शेतकरी वनपरिक्षेत्रातील झाडे तोडून तेथे शेतीही करू लागले आहेत. यामुळे तालुक्यातील वनांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे वनपरिक्षेत्रातील अवैध वृक्षतोडीवर कारवाईची मागणी आहे.
वृक्ष तोडणाऱ्यांवर कारवाई करू
पाटोदा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी एस. आर. काळे म्हणाले की, सौताडा येथील क्षेत्र पाटोदा कार्यालयाकडे देण्यात यावे यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार सुरु आहेत. शिरुर येथील प्रकरणही वरिष्ठ पातळीवर आहे. असे असले तरी पाटोदा वनपरिक्षेत्रात रात्री किंवा इतर वेळी वृक्षतोड कोणी करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. वनपरिक्षेत्रात अनधिकृतपणे कोणी वृक्षतोड करीत असेल तर नागरिकांनी त्याची माहिती द्यावी.