पदाधिकाऱ्यांचा वाद मिटेना
By Admin | Updated: June 26, 2017 23:49 IST2017-06-26T23:47:27+5:302017-06-26T23:49:57+5:30
परभणी :जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये निर्णयक्षमतेचा अभाव दिसून येत असल्याने सदस्यांमधील अंतर्गत वाद मिटता- मिटेना

पदाधिकाऱ्यांचा वाद मिटेना
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये निर्णयक्षमतेचा अभाव दिसून येत असल्याने सदस्यांमधील अंतर्गत वाद मिटता- मिटेना झाले आहेत़ परिणामी निवडलेल्या विषय समितीच्या सदस्य निवडीला अंतिम स्वरुप मिळत नसून त्यामुळे विषय समित्यांच्या बैठकाही बारगळल्या आहेत़
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची २१ मार्च रोजी निवड झाल्यानंतर तब्बल तीन महिने होऊन गेली तरी विषय समित्यांच्या सदस्यांची निवड अद्यापही झालेली नाही़ ३ एप्रिल रोजी आरोग्य, शिक्षण, बांधकाम, महिला व बालकल्याण, कृषी सभापतींची निवड करण्यात आली़ त्यानंतर २१ एप्रिल २०१७ रोजी विविध विषय समित्यांच्या सदस्यांची निवड निश्चित करण्यात आली़ त्यामध्ये जलव्यवस्थापन समितीत ६, बांधकाम, स्थायी, अर्थ, आरोग्य, पशूसंवर्धन व दुग्धशाळा समिती, महिला व बालकल्याण समिती या सर्व समित्यांवर प्रत्येकी ८ सदस्यांची निवड करण्यात आली़ स्थायी, बांधकाम यासारख्या महत्त्वाच्या समितीवर इच्छुकांची संख्या वाढल्याने व अर्ज नसतानाही त्यांना संबंधित समितीवर निवडले गेल्याने सत्ताधारी राष्ट्रवादीसह शिवसेना, काँग्रेस, भाजपाच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली़ त्यावरून ही यादी प्रलंबित राहिली़ १४ जून रोजी हीच यादी अंतीम करून सदस्यांची निवड झाल्याचे सांगण्यात आले़ त्यानंतर २१ जून रोजी स्थायी समितीची तर २२ जून रोजी शिक्षण समितीची बैठक आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले़ २९ जून रोजी सर्वसाधारण सभा घेण्याचेही ठरले़ परंतु, अनेक सदस्यांना विश्वासात न घेता त्यांची विषय समित्यांवर निवड केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या़ त्यामुळे २१ एप्रिल रोजी तयार केलेली यादी पुन्हा प्रलंबित राहिली आहे़ त्यामुळे निश्चित केलेल्या विषय समित्यांच्या बैठका रद्द कराव्या लागल्या़ सत्ताधारी सदस्यांमध्येच एकमत नसल्याने व सत्तेतील पदाधिकाऱ्यांमध्ये निर्णय क्षमतेचा अभाव असल्याने विषय समितीच्या सदस्यांची निवड होऊ शकली नाही़ परिणामी विषय समित्यांच्या सभापतींची तब्बल अडीच महिन्यांपूर्वी निवड होऊनही सदस्यांची निवड मात्र होत नसल्याचा प्रकार पहावयास मिळत आहे़