दुपारी वाद मिटला अन् पहाटे पेटविले
By Admin | Updated: April 23, 2015 00:50 IST2015-04-23T00:34:33+5:302015-04-23T00:50:56+5:30
मधुकर सिरसट ,केज जिल्ह्यात पाण्यासाठी संघर्ष होण्याच्या घटना वाढल्या आहेत. रविवारी तालुक्यातील उमरी येथे घडलेली घटना तर कडेलोट ठरली. हंडाभर पाण्यासाठी एका विधवेला जीवंत पेटविले.

दुपारी वाद मिटला अन् पहाटे पेटविले
मधुकर सिरसट ,केज
जिल्ह्यात पाण्यासाठी संघर्ष होण्याच्या घटना वाढल्या आहेत. रविवारी तालुक्यातील उमरी येथे घडलेली घटना तर कडेलोट ठरली. हंडाभर पाण्यासाठी एका विधवेला जीवंत पेटविले. तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे.
वर्षा दिना मुळे (रा. उमरी) असे पीडित महिलेचे नाव आहे. त्यांनी २०० रुपये महिन्याने भारत वामन मुळे याच्याकडून बोअरचे पाणी घेतले होते. मात्र त्यांच्यात पाणी भरण्यावरून गुरुवारी वाद झाला. हा वाद एवढ्यावरच थांबला नाही तर केज ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादीही दाखल झाल्या. त्यानंतर वाद धुमसतच गेला. रविवारी पहाटे भारत वामन मुळे , धनराज वामन मुळे, मनीषा संपत मुळे हे तिघे वर्षा यांच्या घरावर चालून गेले. त्यांना घराबाहेर बोलावून अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. जिवाच्या आकांताने वर्षा सैरावैरा धावत सुटल्या. मात्र आग विझेपर्यंत त्या ९५ टक्के भाजल्या. त्यानंतर त्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पीठ गिरणी चालवून उदरनिर्वाह
वर्षा मुळे याचे पती दिना यांचा आठ वर्षांपूर्वी अपघात झाला होता. त्यात त्यांचे निधन झाले होते. वर्षा यांना दोन मुले असून गावात पीठ गिरणी चालवून त्या उदरनिर्वाह करत आहेत.
तीनही आरोपी जेरबंद
या प्रकरणातील आरोपी भारत मुळे, धनराज मुळे, मनीषा मुळे यांना केज पोलिसांनी जेरबंद केले आहे. यातील मनीषा हिचा गावात हॉटेलचा व्यवसाय आहे.
वर्षा मुळे यांनी वर्षभरापूर्वी भारत मुळे याला ४० हजार रुपये हातउसणे दिले होते. वर्षा यांनी मुलीच्या लग्नासाठी पैसे परत करण्याची अट घातली होती. मात्र लग्नावेळी भारत याने पैसे परत केले नाहीत. दरम्यानच्या काळात वर्षा यांना मनीषा मुळे हिच्या मध्यस्थीने २०० रुपये महिन्याने भारत याने बोअरवरून पाणी देणे सुरू केले होते. नंतर त्याने पाणी देणे बंद केले. त्यामुळे त्यांच्यातील वाद वाढतच गेला.
वर्षा मुळे व भारत मुळे यांचा वाद ठाण्यापर्यंत पोहंचल्यानंतर फिर्यादी दाखल झाल्या. मात्र त्यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी तंटामुक्ती समितीने पुढाकार घेतला. शनिवारी दुपारी तंटामुक्ती अध्यक्ष भागवत यादव, उपसरपंच बालासाहेब यादव, दत्ता चाळक यांच्या मध्यस्थीने तडजोड झाली होती. मात्र दुसऱ्या दिवशी पहाटे वर्षा यांना पेटविले.