जिल्हा बँकेतील खाते बदलाचा ठराव फेटाळला
By Admin | Updated: March 19, 2016 20:22 IST2016-03-19T20:05:50+5:302016-03-19T20:22:02+5:30
परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये असलेले जिल्हा परिषदेचे खाते काढून ते राष्ट्रीयकृत बँकेमध्ये काढण्याचा सत्ताधाऱ्यांनी आणलेला ठराव बहुतांश सदस्यांनी विरोध केल्याने फेटाळला गेला.

जिल्हा बँकेतील खाते बदलाचा ठराव फेटाळला
परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये असलेले जिल्हा परिषदेचे खाते काढून ते राष्ट्रीयकृत बँकेमध्ये काढण्याचा सत्ताधाऱ्यांनी आणलेला ठराव बहुतांश सदस्यांनी विरोध केल्याने फेटाळला गेला. त्यामुळे हा ठराव रद्द करण्याची नामुष्की सत्ताधारी सदस्यांवर आली.
जिल्हा परिषदेचे जिल्हा मध्यवर्ती बँकेत असलेले खाते काढून ते राष्ट्रीयकृत बँकेमध्ये उघडावे, असा ठराव सर्वसाधारण सभेमध्ये ठेवण्यात आला होता. या ठरावाला काही सदस्यांनी विरोध दर्शविला. तब्बल एक तास याच विषयावर चर्चा झाली. जिल्हा मध्यवर्ती बँकेने जिल्हा परिषदेला १ कोटी ४६ लाख रुपये व्याजापोटी दिले आहेत. तसेच सर्व सुविधा जिल्हा बँक देते. बँकेकडून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णयही घेतले जातात. त्यामुळे या बँकेतून खाते काढण्यात येऊ नये, असे सदस्य बालाजी देसाई यांनी सांगितले. त्यानंतर काही सदस्यांनी कोणाच्या सांगण्यावरुन राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते काढले जात आहे, असा सवाल केला. त्यानंतर हा ठराव ५२ विरुद्ध शून्य मताने नामंजूर करा किंवा मतदान घेण्यात यावे, असा आग्रह सदस्यांनी धरला. त्यानंतर जि. प. अध्यक्ष सभागृहातून त्यांच्या कक्षामध्ये गेले. त्यांच्यापाठोपाठ विरोध करणारे सदस्यही गेले. तब्बल अर्धा तास चर्चा झाल्यानंतर सभागृहामध्ये समशेर वरपूडकर यांच्या हस्ते ३३ सदस्यांच्या स्वाक्षरीचे ठराव फेटाळण्याचे निवेदन अध्यक्षांना देण्यात आले. त्यामुळे हा ठराव फेटाळण्यात आला. परिणामी सत्ताधाऱ्यांची या ठरावावरुन नाचक्की झाल्याचे दिसून आले.