शिवशक्ती कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त
By Admin | Updated: December 9, 2015 23:53 IST2015-12-09T23:42:35+5:302015-12-09T23:53:44+5:30
उस्मानाबाद : संचालक मंडळाचा कालावधी संपूनही एक वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही संचालक मंडळाने निवडणूक तत्परतेने होण्यासाठी करावयाची आवश्यक कारवाई न केल्याने

शिवशक्ती कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त
उस्मानाबाद : संचालक मंडळाचा कालावधी संपूनही एक वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही संचालक मंडळाने निवडणूक तत्परतेने होण्यासाठी करावयाची आवश्यक कारवाई न केल्याने कोळसूर (ता. उमरगा) येथील शिवशक्ती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश प्रादेशिक सहसंचालक नांदेड यांनी दिले असून, प्राधिकृत अधिकारी म्हणून उमरग्याचे सहकारी संस्था सहाय्यक निबंधक एस.एन. गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोळसूरच्या शिवशक्ती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक मंडळ २४ एप्रिल २००९ मध्ये पदारुढ झाले होते. २३ एप्रिल २०१४ मध्ये प्रस्तुत संचालक मंडळाचा कालावधी संपला आहे. निवडणुकीस पात्र असणाऱ्या सहकारी संस्थांच्या प्राथमिक मतदार यादीकरिता अर्हता दिनांक निश्चित करुन तशी लेखी सुचना सदर कारखान्यास देण्यात आली होती. मात्र या सुचनेनंतरही कारखान्याने मतदार यादी सादर केली नसल्याचे प्रादेशिक सहसंचालक श्रीकांत देशमुख यांनी याबाबत २६ नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे. समितीची मुदत संपण्यापूर्वी समितीची निवडणूक घेण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला कळविणे आणि तिच्या व्यवस्थेसाठी सहाय्य करणे, हे समितीचे कर्तव्य असते. समितीने तिची निवडणूक घेण्यासंदर्भात बुद्धी पुरसर कसूर केली असेल तर त्यामुळे कोणत्या कारणास्तव मुदत संपण्यापूर्वी निवडणूक घेता आली नसेल तर समितीचे सदस्य त्यांचे अधिकारपद धारण करण्याचे बंद करतील. आणि अशा परिस्थितीत निबंधक अधिनियमाच्या कलम ७७ (अ) अन्वये कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यानुसार शिवशक्ती सहकारी साखर कारखाना कोळसूर ता. उमरगा यांनी सदर तरतुदीप्रमाणे निवडणूक घेण्यासाठी वरीलप्रमाणे मतदार यादी सादर न करुन तरतुदीचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे प्राप्त अधिकाराचा वापर करुन शिवशक्ती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करुन प्राधिकाऱ्याची नेमणूक करीत असल्याचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. प्राधिकृत अधिकारी एस.एन. गायकवाड (सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ता. उमरगा) यांनी उक्त कलमामध्ये विहीत केलेल्या मुदतीत पुढील योग्य ती कारवाई करावी, असे निर्देशही या आदेशात देण्यात आले आहेत.