निजामांच्या तावडीतून केली शिताफीने सुटका
By Admin | Updated: September 17, 2015 00:31 IST2015-09-16T23:56:40+5:302015-09-17T00:31:43+5:30
पद्माकर वाघ , नेकनूर मराठवाड्यातील निजामांची राजवट उलथून टाकताना स्वातंत्र्यसैनिकांना शक्ती आणि युक्तीचा वापर करावा लागला. बीड शहरातील राजुरी वेसजवळ निजामाच्या पोलिसांनी

निजामांच्या तावडीतून केली शिताफीने सुटका
पद्माकर वाघ , नेकनूर
मराठवाड्यातील निजामांची राजवट उलथून टाकताना स्वातंत्र्यसैनिकांना शक्ती आणि युक्तीचा वापर करावा लागला. बीड शहरातील राजुरी वेसजवळ निजामाच्या पोलिसांनी स्वातंत्र्यसैनिकांना पकडले. यहां ठहरो असे फर्मान सोडत ते रजिस्टर आणण्यासाठी आत गेले तेव्हा त्यांच्या तावडीतून आम्ही मोठ्या शिताफीने सुटका करून घेतली...या आणि अशा इतर आठवणींना स्वातंत्र्यसैनिक प्रल्हादराव कदम यांनी बुधवारी उजाळा दिला.
मराठवाडा मुक्तीसंग्रामात गुप्तहेराची भूमिका साकारणाऱ्या स्वा. सै. कदम यांनी ‘लोकमत’जवळ मुक्तीसंग्रामच्या लढ्यातील अनुभवाची पाने उलगडली. येळंबघाट (ता. बीड) येथील स्वा. सै. कदम आता थकले आहेत. मात्र, मुक्तीसंग्रामाच्या लढ्यातील आठवणी सांगताना त्यांच्यातील करारीपणा जाणवत होता. ते म्हणाले, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली रामलिंग स्वामी, डॉ. कचेरीकर, भाऊराव पाटील, वामनराव वझे व इतरांनी खांद्याला खांदा लावून अनेक जोखमीची कामे केली.
कासीम रझवी याच्या सभेत माझ्याकडे गुप्तहेर म्हणून जबाबदारी होती. ती सभा उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे झाली. निजाम स्टेट पाकिस्तानात विलीन व्हावे असा ठराव तेव्हा संमत करण्यात आला होता व बैठकीला उपस्थित असलेल्यांच्या स्वाक्षऱ्या व अंगठे रक्ताने घेण्यात आले होते. हा सर्व प्रसंग आपण डोळ्याने पाहिला. त्याचे रिपोर्टिंग स्वामी रामानंद तीर्थ यांना व इतरांना दिले. त्यानंतर निजामांचा डाव उधळून लावता आला. स्वातंत्र्यसैनिक निष्ठेने लढले, त्यामुळे निजामांचा पाडाव करता आला, असे सांगायलाही कदम विसरले नाहीत.
जांबियाचा आधार
मुक्तीसंग्रामातील लढ्यात माझ्याकडे गुप्तहेर म्हणून काम सोपविले होते. त्यामुळे निजामांच्या बारीकसारीक हालचालींवर निरीक्षण ठेवावे लागत असे. महिनोंमहिने एकच ड्रेस अंगात असायचा. सोबत जांबिया मात्र नेहमीच ठेवत असे. त्यामुळे भीती वाटायची नाही, असे कदम यांनी सांगितले.
प्रल्हादराव सांगत होते, त्यांच्या थोरल्या बंधूच्या निधनाचे पत्र १९४२ साली घरी आले. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या पत्राची शहानिशा करण्यासाठी मी मांजरसुंबा, येडशी, बार्शी मार्गे पुण्याला गेलो. तेथे समजले की, भाऊ जिवंत आहे. पत्र खोटे असल्याचे निष्पन्न झाल्यावर जीवात जीव आला. त्यावेळी पुण्यात भारत छोडो आंदोलनाचे तीन दिवसीय शिबीर होते. तेथे मी हजेरी लावली. तेंव्हापासून मराठवाडा मुक्तीसंग्रामात लढ्यात सहभागी झालो.