गुरुजींनी उतरविली बाटलीतील झिंग!
By Admin | Updated: November 5, 2014 00:58 IST2014-11-05T00:28:54+5:302014-11-05T00:58:11+5:30
रसुल दा़ पठाण , एकुर्का रोड सेवानिवृत्ती नंतर लोक आराम आणि टाईमपास करण्याच्या गोष्टी शोधतात़ पण जिद्द व आंतरउर्मी असल्यास निवृत्तीनंतरही तरुण मनाने तडफदार कार्य करता येते अन् ते सिद्धीसही नेता येते

गुरुजींनी उतरविली बाटलीतील झिंग!
रसुल दा़ पठाण , एकुर्का रोड
सेवानिवृत्ती नंतर लोक आराम आणि टाईमपास करण्याच्या गोष्टी शोधतात़ पण जिद्द व आंतरउर्मी असल्यास निवृत्तीनंतरही तरुण मनाने तडफदार कार्य करता येते अन् ते सिद्धीसही नेता येते, हेच दाखवून दिलेय् कल्लुरातील बिरादार गुरुजींनी़़़
उदगीर तालुक्यातील दीड-दोनशे उंबऱ्यांचे कल्लूर हे छोटेसे गाव़ निसर्गाच्या हिरव्यागार कुशीत वसलेल्या या गावातील सहशिक्षक ते मुख्याध्यापक असा प्रवास करणारे सुरेश बिरादार यांनी सेवानिवृत्ती नंतर अभिनव व आव्हानात्मक उपक्रम हाती घेतले आहेत़ शिक्षकाला समाजाची नाडी समजते असे म्हणतात़ त्याप्रमाणे गावच्या युवा पिढीची नाडी ‘बाटली’च्या ओझ्याने ताणली जात असून ती रिचविल्यावर उठणारा हात संसारावर पाय देतो याची जाणीव गुरुजींना झाली़
गाव सुधारणेच्या संधी शोधत असलेल्या बिरादार गुरुजींची तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आणि मार्ग सुकर झाला़ तंटामुक्तीच्या आधारे गावातील तंटे सोडवितांना या तंट्यांचे मुळ दारु आहे हे त्यांच्या लक्षात आले़ एक युवक, मित्र मंडळी आणि पारावरची मंडळी यांचे हळूहळू प्रबोधन करीत दारुबंदीची मानसिकता रुजविण्यात गुरुजी यशस्वी झाले़
दारु सोडल्यानंतर गाव सोडून गेलेल्या बाईलेकी पुन्हा नांदायला आल्या आणि गावाचे गोकुळ पुन्हा वसले हे जाणल्या नंतर मात्र संपूर्ण गाव या अभियानात गुरुजींच्या पाठीशी उभा राहिले़ नेहमी दारु पिऊन पोळयात बैलापेक्षा जास्त धिंगाणा करणाऱ्या आणि रंगपंचमीला रंगापेक्षा रक्तरंजित होळी खेळणाऱ्या दारुडे अशी अवहेलना झालेल्या गावाचे चित्र आता पूर्णपणे पालटले आहे़ गणेश विर्सजन व इतर मिरवणुकीत आता बायका माणसे व बालके निर्धास्त सहभागी होवून आनंद साजरा करु लागली आहेत़
केवळ दोन ते तीन महिन्यांमध्ये या गावाचा विलक्षण कायापालट झाला़ आता गुण्या गोविंदाने कष्टाळू वृत्ती आणि घासभर भाकर यासाठी जगणारे हे गाव अन् ग्रामस्थ पाहिले की मन:स्वी आनंद होतो, अशी प्रतिक्रिया बिरादार गुरुजींनी व्यक्त केली़