रोगराईचे दुष्टचक्र

By Admin | Updated: June 23, 2014 00:24 IST2014-06-22T22:25:23+5:302014-06-23T00:24:10+5:30

रमेश शिंदे , औसा मृग नक्षत्रात पाऊस पडेल या आशेपोटी आभाळाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा आणखी एका दुष्टचक्रात सापडला आहे़

Diseases of the pandemic | रोगराईचे दुष्टचक्र

रोगराईचे दुष्टचक्र

रमेश शिंदे , औसा
मृग नक्षत्रात पाऊस पडेल या आशेपोटी आभाळाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा आणखी एका दुष्टचक्रात सापडला आहे़ लांबलेला पाऊस आणि दररोज होणाऱ्या नवनवीन रोगांच्या प्रादुर्भावामुळे औसा तालुक्यातील उटी बु़ व परिसरातील शेतकरी भाजीपाला बाजारात विक्रीसाठी नेण्याऐवजी चक्क बांधावर टाकून विल्हेवाट लावत आहेत.
उटी बु़ लखनगाव या परिसरात तावरजा नदी वाहते़ या तावरजा नदीवरच उटी बु़ गावानजीक तावरजा मध्यम प्रकलप आहे़ या प्रकल्पातील पाण्यामुळे परिसरातील शेती चांगलीच बहरली आहे़ उसासह भाजीपाला व अन्य पिकांचे उत्पन्न घेऊन शेतकरी आपल्या उत्पादनात वाढ करीत असल्याचे दिसून येत होता पण; मागील चार-पाच वर्षांपासून या परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे तावरजा मध्यम प्रकल्प पूर्णपणे भरला नाही. या उन्हाळ्यात तर तो कोरडा पडला आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्रही काही प्रमाणात मोडीत काढावे लागले़
यावर्षी काही प्रमाणात पाणीसाठा झाल्यामुळे तसेच पावसाळा लवकर सुरु होईल़ या आशेपोटी शेतकऱ्यांनी ऊस आणि भाजीपाल्याची लागवड केली़ पण आता विहिरीही कोरड्या पडल्या आणि पाऊसही नाही़ त्यामुळे ऊस वाळत आहे़ तर पाणी नसल्याने भाजीपाल्यावरही विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे बाजारातही या भाजीपाल्याला भाव मिळत नाही.
काही भाज्या तर विक्रीलायकही राहात नाहीत. त्यामुळे शेतकरी भाजीपाला उपटून बांधावर टाकून विल्हेवाट लावत आहेत.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसाऩ़़
उटी बु़ येथील शेतकरी रामकृष्ण जाधव यांनी २ एकर उसाची लागवड केली़ यामध्ये अंतरपीक म्हणून पत्ताकोबीची लागवड केली़ यासाठी ३५ ते ४० हजार रूपये खर्च केले़ परंतु, मृगाच्या प्रारंभीच विहिरीत पाणी नसल्याने ऊस वाळत आहे़ तर कोबीच्या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने ते काढून बांधावर टाकावे लागत आहे़ काहीतरी उत्पन्न हाती पडेल म्हणून लावलेल्या या भाजीपाल्याला पदरमोड करून रानाच्या बाहेर काढावे लागत असल्याने या दुहेरी चक्रातून शेतकरी सावरणार कसा, अशी प्रतिक्रिया जाधव यांनी दिली़

Web Title: Diseases of the pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.