धोक्यात ‘रुग्णसेवा’
By Admin | Updated: July 3, 2017 23:45 IST2017-07-03T23:44:30+5:302017-07-03T23:45:15+5:30
बीड : डॉक्टरांकडून योग्य उपचार होत असले तरी इमारत धोकादायक असल्याने कधी अपघात होईल, याचा नेम नाही, अशी परिस्थिती जिल्ह्यातील तालखेड, रायमोहा व चिंचवण येथील ग्रामीण रुग्णालयाची झाली आहे.

धोक्यात ‘रुग्णसेवा’
सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : डॉक्टरांकडून योग्य उपचार होत असले तरी इमारत धोकादायक असल्याने कधी अपघात होईल, याचा नेम नाही, अशी परिस्थिती जिल्ह्यातील तालखेड, रायमोहा व चिंचवण येथील ग्रामीण रुग्णालयाची झाली आहे. या इमारती धोकादायक असल्याचे समोर आले आहे. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नाईलाजास्तव याच इमारतीत रुग्णसेवा देण्याची वेळ आरोग्य प्रशासनावर आली आहे.
जिल्ह्यात एक जिल्हा रुग्णालय, तीन उपजिल्हा रुग्णालये, एक स्त्री रुग्णालय व दहा ग्रामीण रुग्णालये कार्यरत आहेत. पैकी शिरूर तालुक्यातील रायमोहा, वडवणी तालुक्यातील चिंचवण व माजलगाव तालुक्यातील तालखेड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात या इमारती गळत आहेत, तसेच प्लास्टर रुग्णांच्या अंगावर पडते, तर छत कोसळण्याची भीती आहे. विजेची सोय नाही, खिडक्या, फरशाही तुटलेल्या आहेत.
या इमारतींच्या दुरुस्ती तसेच वापरण्यास योग्य आहेत किंवा नाहीत, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांच्याकडे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांनी पत्र पाठवून या इमारती वापरण्यास अयोग्य असल्याचा अहवाल दिला आहे. पर्यायी जागा नसल्याने आजही याच धोकादायक इमारतींमध्य उपचार करण्याची वेळ आली आहे.