शिक्षक नेत्यांविरुद्ध असंतोषाचा उद्रेक

By Admin | Updated: January 5, 2016 00:08 IST2016-01-04T23:41:30+5:302016-01-05T00:08:42+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्यातील बहुतांश शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत:लाच शिक्षणाधिकारी समजत शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांशी सुरू केलेली अरेरावी,

Discontent Outbreak Against Teacher Leaders | शिक्षक नेत्यांविरुद्ध असंतोषाचा उद्रेक

शिक्षक नेत्यांविरुद्ध असंतोषाचा उद्रेक


उस्मानाबाद : जिल्ह्यातील बहुतांश शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत:लाच शिक्षणाधिकारी समजत शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांशी सुरू केलेली अरेरावी, दडपशाही, दंडेलशाहीविरोधात खदखदणाऱ्या असंतोषाचा सोमवारी उद्रेक झाला़ परिचर एस़ए़लांडगे यांना झालेली शिवीगाळ, मारहाण आणि शिक्षक नेत्यांचा कामकाजात वाढलेला हस्तक्षेप याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी थेट लेखणीबंद आंदोलनाचे हत्यार उपसले़ संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी शिक्षकांचे नेते म्हणून घेणाऱ्यांच्या निषेधार्थ कामावर बहिष्कार टाकल्याने सोमवारी शिक्षण विभागाचे कामकाज ठप्प झाले होते़
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी यांच्या दालनात परिचर म्हणून काम करणारे एस़ए़लांडगे हे २ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे काम करीत होते़ त्यावेळी कार्यालयातील एका महिला परिचराच्या सांगण्यावरून अल्पसंख्यांक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बशीर तांबोळी व कल्याण बेताळे यांनी परिचर लांडगे यांना प्राथमिकचे शिक्षणाधिकारी यांच्या दालनातच बेदम मारहाण करीत शिवीगाळ केली़ या प्रकारामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगत, या अन्यायकारक प्रकाराच्या निषेधार्थ सोमवारी लेखणीबंद आंदोलन करण्यात आले़
एकीकडे शासन गोरगरिबांच्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी कोट्यवधी रूपये खर्च करून विविध योजना राबवित आहे़ या योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ व्हावा, यासाठी परिचरापासून शिक्षणाधिकारी, मुख्याधिकारी, राजकीय पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे़ मात्र, जिल्ह्यात वाढलेल्या शिक्षक संघटना पाहता शासनाच्या या योजनांनाच खो बसताना दिसत आहे़ विशेषत: संघटना आणि त्यांचे बहुतांश नेते हे शाळा सोडून जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या कार्यालयात, आवारातच अधिक भटकत असल्याने कार्यालयात कामकाज करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढल्याच्या अनेक तक्रारी आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांनी केल्या. यापूर्वीही जिल्हा परिषदेत व विविध तालुक्यातील गटशिक्षण कार्यालयात स्वत:ला शिक्षकांचे नेते म्हणून घेणाऱ्या या पदाधिकाऱ्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध कारणांनी वेठीस धरून अपमानास्पद वागणूक दिल्याच्या तक्रारीही यावेळी कर्मचाऱ्यांनी केल्या. विशेषत: राजकीय पक्षांचे काही संघटनांना पाठबळ असल्याने पदाधिकाऱ्यांनी आता थेट अरेरावी, दंडेलशाही सुरू केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे़ या पदाधिकाऱ्यांची मुजोरी, दंडेलशाही थांबवून त्यांना शाळेवर राहण्याच्या सक्तीच्या सूचना देण्याची गरज असून, वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही अनेक आंदोलकांनी यावेळी केली़ ही मंडळी शाळेवरच थांबली तर शिक्षण विभागाचे कामकाज अधिक दर्जेदार आणि चांगल्या पध्दतीने होईल, असा विश्वासही अनेकांनी व्यक्त केला आहे़
शिक्षक संघटनेचे पदाधिकारी कार्यालयीन कामकाजावेळी नेहमीच अरेरावीची भाषा वापरून इच्छेप्रमाणे संचिकेवर अभिप्राय घेवून कार्यालयातील कामकाजात ढवळाढवळ करून हस्तक्षेप करीत असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे़
शिवाय जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी, सदस्यांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे़ या आंदोलनात एफ़जी़गिरी, एऩ पी़ वाघमारे, व्ही़ व्ही़ कुलकर्णी, एस़ एस़ कापडे, एस़ एम़ पंडागळे, जे़ सी़ सुरवसे, ए़ व्ही़ अंधारे, के़ ए़ सरवदे, ए़ एच़ वेदपाठक, एल़ एऩ गरूड, एस़ एस़ काळे, के़ व्ही़ शेख, एम़ ए़ मगर, व्ही़ एस़ पोतदार, बी़ व्ही़ क्षीरसागर, एम़ पी़ कुंभार, आऱ ए़ चांदणे, एस़ जी़ क्षीरसागर आदीनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)

Web Title: Discontent Outbreak Against Teacher Leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.