शेतकऱ्यांसाठी निराशाजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:18 IST2021-02-05T04:18:31+5:302021-02-05T04:18:31+5:30
अर्थसंकल्प महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी निराशाजनक आहे. कारण, पीएम सन्मान योजनेतील १० टक्के रक्कम कमी करण्यात आली आहे. गहू खरेदीसाठी ७५ ...

शेतकऱ्यांसाठी निराशाजनक
अर्थसंकल्प महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी निराशाजनक आहे. कारण, पीएम सन्मान योजनेतील १० टक्के रक्कम कमी करण्यात आली आहे. गहू खरेदीसाठी ७५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचा लाभ ४३ लाख शेतकऱ्यांना होईल, असा दावा करण्यात आला आहे. याचा फायदा पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश येथील गहू उत्पादक शेतकऱ्यांना होईल. कारण तिथे सरकार शेतकऱ्यांकडून गहू खरेदी करते. मात्र, महाराष्ट्रात तेवढे गहू उत्पादन होत नाही व सरकार खरेदीही करत नाही, यामुळे येथील शेतकऱ्यांना फायदा नाही.
- सुशील बलदवा, अध्यक्ष, महाकेशर बागायतदार संघ
-----
ग्रामीणसाठी कमी, शहरासाठी भरघोस
शेतकऱ्यांचा अर्थसंकल्प असे म्हटले जात असले तरी, सत्य म्हणजे ग्रामीण भागासाठी कमी व शहरासाठी भरघोस, असेच अर्थसंकल्पाविषयी म्हणता येईल. शेतीमालाचे भाव दीडपट वाढविण्यात येणार आहेत. दुसरीकडे डाळीवर सेस लावण्यात आला आहे. लघुसिंचनसाठी ५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक राज्याला ५०० कोटीसुद्धा मिळणार नाहीत. मग लघुसिंचन कसे होणार? चहा मळ्यावरील मजुरांसाठी १ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्या मजुरांचे काय ते चहा कंपन्या बघून घेतील, त्याऐवजी सरकारने शेतमजुरांसाठी तरतूद करणे आवश्यक होते.
- डॉ. भगवान कापसे
प्रणेते, गटशेती