नादुरुस्त बसेसमुळे प्रवाशांची गैरसोय
By Admin | Updated: August 31, 2014 01:09 IST2014-08-31T00:47:36+5:302014-08-31T01:09:56+5:30
रोकडा सावरगाव : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदपूर आगारातील बहुतांशी बसेस ह्या नादुरस्त, गळक्या असल्याने प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे़

नादुरुस्त बसेसमुळे प्रवाशांची गैरसोय
रोकडा सावरगाव : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदपूर आगारातील बहुतांशी बसेस ह्या नादुरस्त, गळक्या असल्याने प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे़ त्यामुळे प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत असून अवैध वाहतुकीकडे प्रवाशांचा ओढा वाढलेला पहावयास मिळत आहे़
अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव येथील नागरिक एसटी महामंडळाने बसनेच प्रवास करतात़ विशेष म्हणजे, सन २००० मध्ये येथील ग्रामपंचायतने ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन खाजगी अवैध प्रवाशी वाहतूक बंद करुन महामंडळाची बस चालू करावी़ जर गावातील कोणी अवैध वाहनाने प्रवास केल्यास त्याला दंड लावण्यात येईल असे बजावले होते़
तत्कालिन आगारप्रमुख गोले यांना बस सुरु करण्याची मागणी केली होती़ तेव्हा आगारप्रमुखानी जनता सेवा गाडी सुरु केली़ त्यामुळे ग्रामस्थांना बसशिवाय पर्याय नव्हता़ त्यामुळे सन २००० पासून ते आजतागायत गावातील नागरिक केवळ बसनेच प्रवास करत असतात़
बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ध्येय ठेऊन एसटी महामंडळाने प्रवाशांना सेवा देण्यास सुरु केली आहे़ परंतु, आलिकडच्या काळात अनेक बसेस मोडकळीस आल्या आहेत़ यातील काही बसेसच्या काचा फुटलेल्या आहेत तर काही बसेसमध्ये बसण्यासाठी व्यवस्थित सीट नाहीत़ पावसाळ्याच्या दिवसात बसेसला गळती लागलेली असते़ या मोडकळीस आलेल्या बसेस ग्रामीण भागासाठी सोडण्यात येत आहेत़ त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे़ एखाद्यावेळेस बस पंक्चर झाली तर अहमदपूर डेपोतून टायर आणावे लागते़ टायर आणण्यासाठी ३ ते ४ तास लागतात़ त्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे़ मोडकळीस आलेल्या बसेसमुळे प्रवाशी वैतागले आहेत़ मुक्कामी जाणाऱ्या वाहक व चालकांची या गाड्यांमुळे अडचण होत आहे़ (वार्ताहर)
अहमदपूर आगारामध्ये एकूण ८२ बसेस असून त्यातील काही गाड्या मोडकळीस आल्या आहेत़ रस्त्याच्या दुरावस्थेमुळे बसेसचे नुकसान होत आहे़ त्यामुळे पावसाळ्यात गाड्या गळत आहेत़ प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून योग्य ती दक्षता घेतली जाईल, असे अहमदपूरचे आगार प्रमुख एऩपी़जाधव यांनी सांगितले़