परळी शहरवासियांची गैरसोय, पथदिवे बंद
By Admin | Updated: June 16, 2014 01:13 IST2014-06-16T00:00:20+5:302014-06-16T01:13:00+5:30
परळी: येथील उड्डाणपूल परिसरातील पथदिवे मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत.

परळी शहरवासियांची गैरसोय, पथदिवे बंद
परळी: येथील उड्डाणपूल परिसरातील पथदिवे मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. बंद असलेल्या पथदिव्यांमुळे परिसरात अंधार पसरत असून, नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. न.प.च्या दुर्लक्षामुळे बंद असलेले पथदिवे आता उजेडात आले आहेत. याकडे न.प. दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही नागरिकांमधून केला जात आहे.
शहरातील उखळवेस, कालरात्री मंदिर भागात नगर परिषदेने लाखो रुपये खर्चून अंधाराचे जाळे संपुष्टात आणण्यासाठी तीन वर्षांपूर्वी हायमास्ट दिवे बसविण्यात आले होते. ज्यादिवशी बसविले त्या दिवशीपासून हे पथदिवे बंदच आहेत. त्यामुळे या चौकातील अंधाराचे सावट दूर होण्याऐवजी अडचण होऊन बसली आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरीलही अनेक पथदिवे इलेक्ट्रीक साहित्याअभावी बंद आहेत. त्यामुळे अनेक गल्लीबोळात पथदिवे बंद अवस्थेत असल्याचे दिसून येत असल्याने नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
परळी नगर परिषदेकडून गेल्या तीन महिन्यांपासून मेन रोडवरील पथदिवे दुरुस्त करण्यासाठी टी५, २५० वॅट चोक, गल्लीबोळातील पथदिव्यांसाठी सीएफएल ट्यूब, ४०० वॅट ट्यूब, ४०० वॅट चोक आदी साहित्य नगर परिषदेकडे अद्यापही उपलब्ध नाही. त्यामुळे बंद असलेले पथदिवे चालू करता येत नाहीत. चालू पथदिवे कमी व बंद पथदिवे जास्त, असा प्रकार उड्डाण पूल परिसरात दिसून येत आहे. उड्डाण पुलावरीलही पथदिवे मागील अनेक दिवसांपासून बंदच आहेत. त्यामुळे याठिकाणी अपघात, चोऱ्या आदी प्रकार घडण्याममध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. एक मिनार चौक ते शिवाजी चौक, आझाद चौक, पोलीस ठाणे, ईटके कॉर्नर, टॉवर ते गणेशपार या मुख्य रस्त्यावरील पथदिवे अनेकवेळा बंद अवस्थेत आढळून आले. याकडे नगर परिषद दुर्लक्ष करीत असल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस घडणाऱ्या या घटनांना पथदिवेही बंद असल्याचे कारण ठरल्याचे नागरिकांनी सांगितले. उखळवेस, कालरात्री मंदिर, भीमनगर, या भागातील हायमास्ट दिवे बंदच आहेत. हे पथदिवे कधी चालू असतात तर कधी बंद. नगर परिषदेने लवकरात लवकर हे पथदिवे चालू करुन नागरिकांचे हाल थांबवावेत, अशी मागणी भाजपा दलित आघाडीचे शहराध्यक्ष रमेश गायकवाड यांनी केली.
वैद्यनाथ मंदिर परिसरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरातील पथदिवे नेहमी बंद असतात, असे येथील नागरिकांनी सांगितले. याबाबत नगर परिषदेकडे येथील नागरिकांनी तक्रार केली असता इलेक्ट्रीकल साहित्य उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.
श्यामाप्रसादजी मुखर्जी उड्डाणपूलावरील शनिवारी २१ पथदिवे रात्रीच्या वेळी बंद होते तर केवळ बोटावर मोजण्याइतकेच चालू होते. त्यामुळे अर्धा उड्डाणपूल अंधारात आहे, असे पाहणीत आढळून आले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भोवतालचे पथदिवे बंद दिसून आल्याने सर्वत्र अंधाराचे सावट पसरले होते. याबाबत परळीचे नगराध्यक्ष दीपक देशमुख म्हणाले, नादुरुस्त पथदिवे दुरुस्त करण्याचे काम कर्मचारी युद्धपातळीवर करीत आहेत. नागरिकांची तक्रार आलेली नाही. जे हायमास्ट दिवे बंद आहेत त्या दिव्यांना वीजपुरवठा जोडला जाईल व हायमास्ट दिवे चालू करण्यात येतील. शहरातील विद्युत व्यवस्थेचे नूतनीकरण करण्याच्या कामासही प्रारंभ करण्यात आला आहे. पथदिवे चालू करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
नागरिकांमधून होतोय संताप व्यक्त
पथदिवे दुरुस्तीसाठी न.प.कडे नाही इलेक्ट्रीकल साहित्य
उड्डाणपूलावरील २१ पथदिवे बंद तर १४ चालू
बाजार समिती भोवतीचेही पथदिवे बंद
तीन वर्षांपासून हायमास्टचे बल्ब नादुरुस्त
न.प.चे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप