शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित

By Admin | Updated: June 30, 2014 00:37 IST2014-06-29T23:44:27+5:302014-06-30T00:37:13+5:30

परभणी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरल्यानंतर येथील विद्यार्थ्यास तब्बल तीन वर्षांपासून लाभ मिळालेला नाही.

Disadvantaged students from scholarship | शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित

शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित

परभणी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरल्यानंतर येथील विद्यार्थ्यास तब्बल तीन वर्षांपासून लाभ मिळालेला नाही. या संदर्भात विद्यार्थ्याच्या पालकाने संबंधितांकडे अनेकवेळा तक्रारही नोंदविली आहे.
येथील बाल विद्यामंदिर शाळेचा विद्यार्थी राजन रामचंद्र जाधव याने २०११-१२ मध्ये माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा दिली होती. या परीक्षेत तो उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीधारक ठरला होता. शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी लागणारा राष्ट्रीय बँकेचा खाते क्रमांक तसेच आय.एफ.सी. कोड संबंधितांना कळविण्यात आला. सतत तीन वर्षे पाठपुरावा करुनही या विद्यार्थ्यास ही शिष्यवृत्ती मिळालेली नाही.
विद्यार्थ्यांना प्रोत्साह देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात. परंतु जर विद्यार्थ्यांना वेळच्या वेळी शिष्यवृत्ती मिळत नसेल तर या योजनेचा उद्देशच सफल होत नाही, असे दिसते. सदर विद्यार्थ्याच्या पालकाने तक्रार केल्याने शिष्यवृत्ती न मिळण्याचा प्रकार समोर आला आहे. शिष्यवृत्तीचा लाभ न मिळालेले अनेक विद्यार्थी असू शकतात. त्यामुळे शिक्षण विभागाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
आॅनलाईन खाते क्रमांक कळवावा लागतो
यासंदर्भात शिक्षणाधिकारी आर.बी. गिरी यांच्याशी संपर्क साधला असता, शिष्यवृत्ती मिळाली नसल्याची तक्रार आपल्याकडे आली नाही. शिष्यवृत्तीसाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत आॅनलाईन खाते क्रमांक कळवावा लागतो, असे त्यांनी सांगितले.
अशी मिळते शिष्यवृत्ती
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन गटासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. सातवी इयत्तेतील विद्यार्थी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा देण्यास पात्र असतो. हा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरल्यानंतर त्यास दहावीपर्यंत प्रतिवर्षी १५०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.

Web Title: Disadvantaged students from scholarship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.