हर्सूल-टी पॉइंटवर प्रवाशांची गैरसोय
By Admin | Updated: August 30, 2014 00:16 IST2014-08-30T00:10:49+5:302014-08-30T00:16:56+5:30
औरंगाबाद : सिल्लोडमार्गे जळगाव, भुसावळ इ. ठिकाणी जाण्यासाठी हर्सूल टी-पॉइंट येथून बस पकडावी लागते; परंतु प्रवास सुरू करण्याआधी या ठिकाणी प्रवाशांना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे.

हर्सूल-टी पॉइंटवर प्रवाशांची गैरसोय
औरंगाबाद : सिडको आणि परिसरातील रहिवाशांना सिल्लोडमार्गे जळगाव, भुसावळ इ. ठिकाणी जाण्यासाठी हर्सूल टी-पॉइंट येथून बस पकडावी लागते; परंतु प्रवास सुरू करण्याआधी या ठिकाणी प्रवाशांना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. भररस्त्यावर उभे राहून बस येण्याची प्रतीक्षा प्रवाशांना करावी लागत आहे.
मध्यवर्ती बसस्थानकातून सिल्लोडमार्गे जळगाव, भुसावळ इ. गावांसाठी बस सोडण्यात येतात. या बस हर्सूल टी-पॉइंटमार्गे जातात. त्यामुळे सिडको आणि परिसरातील रहिवाशांना या गावांसाठी हर्सूल टी-पॉइंटहून बस पकडावी लागत आहे. या ठिकाणी अनेकदा बस थांबत नसल्याचे प्रवाशांकडून सांगितले जाते, तर अनेकदा मध्यवर्ती बसस्थानकातून खचाखच भरून येणाऱ्या बसमुळे हर्सूल टी-पॉइंटवरील प्रवाशांना अनेकदा सिल्लोडपर्यंत जागा मिळत नाही. याशिवाय येथे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, मोठ्या शेडची सुविधा नाही. शिवाय या ठिकाणी उतरल्यावर सिडको भागात जाण्यासाठी रिक्षाचालकांकडून जादा पैसे आकारले जातात. विविध ठिकाणी थांबा असलेली बससेवा सुरू करण्याची मागणी होत आहे.
काळी-पिवळींचा विळखा
हर्सूल टी-पॉइंट चौकात काळी-पिवळींचा विळखा दिसून येतो. एसटी महामंडळाच्या बसची प्रतीक्षा करण्यापेक्षा नाइलाजाने काळी-पिवळीतून प्रवास करण्यावर अनेक प्रवासी भर देत असल्याचे दिसून येते. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नासही फटका बसत आहे.
स्वतंत्र बससेवेची मागणी
सिल्लोडमार्गे जळगाव, भुसावळ, बुलडाणा, मलकापूर इ. गावांसाठी सिडकोतून स्वतंत्र बससेवा सुरूकरण्यात यावी तसेच या गावांना जाण्यासाठी सिडकोतील एसबीआय चौक, वोखार्ड चौक, आंबेडकर चौक, टीव्ही सेंटर, हडको कॉर्नर येथे थांबा असणारी स्वतंत्र बससेवा सुरूकरावी, अशी मागणी होत आहे. यासाठी सिडको बसस्थानक आणि सिल्लोड बसस्थानकात स्वतंत्र प्लॅटफॉर्म ठेवण्यात यावे, अशीही मागणी करण्यात येत आहे.
सिल्लोडमार्गे जळगाव, भुसावळ इ. गावांसाठी सिडकोतून स्वतंत्र बससेवा सुरू करण्याबाबत विचार सुरू असल्याचे राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.