सिल्लोड: शहरात सुरू असलेल्या एका पोलिस भरती अकॅडमीमध्ये संचालकाने प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. आपल्या लव्हस्टोरीचे बिंग फुटेल म्हणून आरोपीने शनिवारी दुपारी २.३० वाजता केळगाव घाटात विद्यार्थ्याला मारहाण आणि त्याचे अपहरण केले.
अमोल गजानन मख (वय २० वर्षे रा. केळगाव) असे अपहरण झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तर, हिंदवी करीअर अकॅडमीचा संचालक दशरथ विठ्ठल जाधव (रा. सिल्लोड), त्याचा मित्र गणेश कृष्णा जगताप (रा. वडोदचाथा), अकॅडमीत प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी गणेश सोनूर्सिंग चव्हाण व प्रवीण लालचंद राठोड (दोघे रा. को-हाळा तांडा) अशी आरोपींची नावे आहेत. या सर्व आरोपीना पोलिसांनी अटक करून सिल्लोड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अपहरण झालेला अमोल मख सिल्लोड शहरातील हिंदवी करीअर अकॅडमीमध्ये एका वर्षापासून पोलिस भरतीचे प्रशिक्षण घेत होता. तिथे त्याची संचालक दशरथ जाधव यांच्या सोबत मैत्री झाली. जाधव याचे अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या एका मुलीवर प्रेम होते. जाधवने अमोलला मोहरा करुन दोघांची ओळख करून देण्यास भाग पाडले आणि प्रशिक्षण घेणाऱ्या मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरू केले.
याबाबत अमोलने संचालकाला खडसावले, त्यावरून दोघांचे एका महिन्यापूर्वी बिनसले. आरोपीने तेव्हाच अमोलला अमोलला अकॅडमीमधून काढून टाकले होते. मात्र, दोघांच्या प्रेम प्रकरणाचे काही व्हाईस रेकॉर्डिंग व पुरावे अमोलकडे होते. त्याने हे पुरावे व्हायरल केले, तर आपले बिंग फुटेल, या भीतीने जाधव यांनी अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या दोघा मुलांच्या मदतीने अमोलला केळगाव घाटात बोलावून घेतले.
तिथे दबा धरुन बसलेल्या जाधव व त्याच्या एका मित्राने आधी अमोलला लाठ्या काठ्याणी मारहाण केली व प्रेम प्रकरणाचे पुरावे मागितले. त्याने देण्यास नकार दिला असता, त्याला सिल्व्हर रंगाच्या निसान कार (क्रमांक एमएच ४८ ए ९९१८) मध्ये जबरदस्तीने बसवून अपहरण केले. मात्र, कारमध्ये डांबून सिल्लोडकडे नेत असताना अमोलच्या एका ओळखीच्या व्यक्तीने बघितले आणि सिल्लोड ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक लहू घोडे आणि इतर कर्मचाऱ्यांनी भराडीजवळ फिल्मी स्टाईल सापळा रचून सर्व आरोपीना रंगेहात पकडले आणि अमोलची सुटका केली.