चिंचपूर गावात भीषण परिस्थिती; अर्धे गाव आजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:05 IST2021-05-05T04:05:01+5:302021-05-05T04:05:01+5:30
श्यामकुमार पुरे सिल्लोड : तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. गेल्या तीन महिन्यांत तालुक्यात १९१७ जणांना कोरोनाची लागण ...

चिंचपूर गावात भीषण परिस्थिती; अर्धे गाव आजारी
श्यामकुमार पुरे
सिल्लोड : तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. गेल्या तीन महिन्यांत तालुक्यात १९१७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, तब्बल ९९ जणांचा मृत्यू झाला आहे. यात गंभीर बाब म्हणजे सिल्लोडपासून काही अंतरावर असलेल्या चिंचपूर गावाला कोरोनाने सर्वाधिक विळखा घातला आहे. दीड महिन्यात येथील तब्बल १२ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला, तर यात दोन कर्त्या तरुणांचा समावेश आहे. दोन हजार लोकसंख्या असलेल्या या गावात तब्बल ७० जणांना कोरोनाची लागण झाली असून, अर्धे गाव सर्दी, ताप, खोकला या संसर्गजन्य आजारांनी त्रस्त आहे.
एकीकडे अशी भयावह परिस्थिती असताना चिंचखेड गावात आरोग्य यंत्रणा बघ्याची भूमिका घेत आहे. दोन हजार लोकांपैकी एका महिन्यात आरोग्य यंत्रणेकडून केवळ ६०० लोकांच्या चाचण्या केल्या असून, अद्यापही १४०० लोकांची चाचणी करणे बाकी आहे. जास्तीत जास्त टेस्ट करून बाधित रुग्णांना जवळच कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाइन करावे. आवश्यक औषध साठा, ऑक्सिजन, उपलब्ध करून साथ आटोक्यात आणणे गरजेचे आहे.
अंत्ययात्रा व लग्न सोहळ्यात गर्दी, कोरोनाचा शिरकाव
सिल्लोडपासून १५ कि. मी. अंतरावर चिंचपूर गाव आहे. गावाची लोकसंख्या दोन हजारांच्या जवळपास आहे. तसे हे गाव निसर्गरम्य वातावरणात आहे. कोरोनाची दुसरी लाट येताच गावकऱ्यांना वारंवार नियम पाळण्याच्या सूचना ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केल्या; पण सूचनांकडे दुर्लक्ष केले गेले. गावातील लग्न समारंभ, तसेच अंत्ययात्रेला नातेवाइकांची मोठी गर्दी जमली. यातून कोरोनाने गावात शिरकाव केला. हळूहळू संसर्ग वाढत गेला. आज अर्धे गाव आजारी झाले आहे.
संपूर्ण गावच बनले हॉटस्पॉट
कोरोनाची रुग्णसंख्या वाढत गेल्यामुळे संपूर्ण गावाला हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आले. काही रुग्णांना घरात, तर काहींना शेतात क्वारंटाइन करून उपचार केले जात असल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने गावात मिनी कंटेन्मेंट झोन तयार करून फवारणी केली, तर अन्य उपाययोजना केल्या जात आहेत, अशी माहिती उपसरपंच कैलास जंजाळ यांनी दिली.
अधिकारी धावले, पण यंत्रणा तोकडीच
चिंचपूर गावात कोरोनाचा विळखा वाढल्याने गावाच्या मदतीसाठी प्रशासन धावून आले. तत्कालीन उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे, गटविकास अधिकारी डॉ. अशोक दांगोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश राठोड, तहसीलदार विक्रम राजपूत, नायब तहसीलदार संजय सोनवणे, सुरेश बनकर, इद्रीस मुल्तानी, डॉ. नासिरखान पठाण यांनी भेट देऊन आरोग्य यंत्रणेला सूचना दिल्या. मात्र, येथील आरोग्य यंत्रणा तोकडी पडल्याचे चित्र दिसत आहे.
नागरिकांचे सहकार्य अपेक्षित
बाधित रुग्णांना आम्ही सिल्लोड कोविड सेंटरमध्ये जाण्याच्या सूचना दिल्या; पण लोक ऐकत नाहीत. आम्हाला घरातच उपचार द्या, असा आग्रह करतात. यामुळे लोकांना गावात, घरात, शेतात औषधोपचार सुरू आहे. आरोग्य यंत्रणा जोमाने काम करीत आहे. ६०० लोकांच्या आरटीपीसीआर टेस्टिंग केल्या आहेत. दररोज गावात आशा कर्मचारी, आरोग्य सेवक, शिक्षकांमार्फत तपासणी सुरू आहे; पण लोक त्याला प्रतिसाद देत नाहीत. शंभर जणांना लसीकरण झाले आहे. - डॉ. नासिरखान पठाण, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, पालोद.