दिंडीचे प्रस्थान
By Admin | Updated: June 21, 2014 00:56 IST2014-06-20T23:58:53+5:302014-06-21T00:56:19+5:30
कंधार: प्रसिद्ध श्री संत साधू महाराज यांनी सुरु केलेली कंधार - पंढरपूर पायी वारीची परंपरा आजही अखंडपणे चालू आहे. तिसऱ्या पिढीने दिंडीची परंपरा जतन केली

दिंडीचे प्रस्थान
कंधार: प्रसिद्ध श्री संत साधू महाराज यांनी सुरु केलेली कंधार - पंढरपूर पायी वारीची परंपरा आजही अखंडपणे चालू आहे. तिसऱ्या पिढीने दिंडीची परंपरा जतन केली असून २० जून रोजी टाळ मृदंगाच्या निनादात दिंडीने प्रस्थान केले. जागोजागी दिंडीचे स्वागत करण्यात आले.
पंढरपूर पायी वारी साधू महाराज यांच्या काळापासून सुरु आहे. महाराज भगवान दत्तात्रयाचे अनुग्रहीत होते. त्याचप्रमाणे पंढरीचे निष्ठावान वारकरी होते. वारीला प्रस्थान करण्यापूर्वी आपले घर गरिबांना लुटण्यास महाराज मोकळे करत असत. हातात चपळ्या, गळ्यात वीणा, चाळ आणि मुखात विठ्ठलाचे नाव घेत पंढरीच्या दिशेने निघत असत. जाताना वाटेत अनेक मुक्काम करत महाराज भक्तांसह पायी विठ्ठलाचे दर्शन घेत असत. महाराज हे परभणी जिलञह्यातील कानडखेडचे. परंतु कंधारला ते स्थायिक झाले. महाराज दत्तात्रयाच्या भेटीसाठीही माहूरला जात असत. असेच जाताना त्यांची उमरखेड येथे प्रकृती बिघडली. दोन धर्मात ऐक्याचा पुरस्कार करण्याचे महान कार्य करणारे महाराज वैकुंठवासी झाले. आजही त्यांची उमरखेडला समाधी आहे. महाराजांची परंपरा वंशपरंपरेने जिद्दीने चालविली.
शुक्रवारी दिंडी विठ्ठलाच्या जयघोषात व टाळ मृदंग, वाद्याच्या निनादात शहरातून प्रस्थान केली. दिंडी एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांच्या नेतृत्वाखाली निघाली. दिंडीत दत्त महाराज, शिवाजी केंद्रे, सूर्यकांत चालीकवार, नरसिंग करेवाड आदींसह भाविक, स्त्री, पुरुष सहभागी झाले होते. आ. शंकरअणा धोंडगे, अॅड. मुक्तेश्वर धोंडगे, माजी नगराध्यक्ष अरविंद नळगे, जि. प. सदस्य दिलीप धोंडगे, दत्ता पवार, बाबूराव केंद्रे, मधुकर डांगे, माजी नगरसेवक गणेश कुंटेवार, भगवान महाराज व्यास, गोविंद हेडंगे, मिलिंद महाजन, गणेश महाजन आदींनी स्वागत केले.पायी दिंडीत नगराध्यक्षा शोभाताई नळगे या पंढरपूरपर्यंत सहभागी झाल्याची माहिती शहाजी नळगे यांनी दिली.
कमानीचा झरा व गुराखी गडावर दिंडीचे माजी खासदार भाई डॉ. केशवराव धोंडगे, प्राचार्य डॉ. अशोक गवते, प्राचार्य डॉ. जी. आर. पगडे, प्रा. डॉ. एकनाथ पवार, प्रा. शंकर आंबटवाड, व्ही. जी. चव्हाण, डॉ. सुभाष नागपूर्णे, प्रा. डॉ. डी. एस. सावंत, माजी सरपंच शिवाजी आईनवाड आदींनी स्वागत केले. (वार्ताहर)
पायी दिंडीला झाले ६० वर्षे पूर्ण
अलीकडच्या काळात पायी दिंडीचे शंकर महाराज व सीताराम महाराज कंधारकर यांनी पुनरुज्जीवन केले. कंधारच्या या प्रसिद्ध पायी दिंडीला ६० वर्षे पूर्ण झाले आहेत. शंकर महाराज कंधारकर व सीताराम महाराज खंदारकर यांच्या निधनानंतरही संस्थानचे पिठाधीश एकनाथ महाराज व त्यांचे बंधू ज्ञानेश्वर महाराज यांनी परंपरा जतन केली आहे.