इंदिरानगरातील अतिक्रमण काढण्यास ‘भूमीअभिलेख’चा खोडा
By Admin | Updated: December 9, 2015 00:40 IST2015-12-09T00:23:19+5:302015-12-09T00:40:11+5:30
जालना : जुना जालना भागातील इंदिरा नगरातील मोठ्या क्षेत्रावर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी तालुका भूमिअभिलेख कार्यालयाकडून अद्ययावत मोजमाप

इंदिरानगरातील अतिक्रमण काढण्यास ‘भूमीअभिलेख’चा खोडा
जालना : जुना जालना भागातील इंदिरा नगरातील मोठ्या क्षेत्रावर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी तालुका भूमिअभिलेख कार्यालयाकडून अद्ययावत मोजमाप पालिकेला देण्यास विलंब होत आहे. परिणामी पालिकेला कारवाई करता येत नसल्याचे सांगण्यात येते.
तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी या भागातील अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घेतला होता. नागरिकांनी विविध कागदपत्रे सादर करून या कारवाईला स्थगिती मिळविली होती. यानंतर पालिकेने पुन्हा जमिनीची मोजणी करून अतिक्रमण झाल्याचे स्पष्ट केले. यानंतर पालिकेने तालुका भूमिनिरीक्षक कार्यालयाकडून इंदिरनगरचे पूर्ण मोजमाप करण्यात आले.
पालिकेकडूनही जुने मोजमाप, अतिक्रमित भागाचे नकाशे भूमिनिरीक्षक कार्यालयाकडे सादर करण्यात आले. परंतु या कार्यालयाकडून अद्यापही अद्ययावत मोजमाप मिळाले नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.यासाठी सदर कार्यालयास वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. तालुका भूमीनिरीक्षक कार्यालयाकडून मोजमाप मिळाल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल असे पालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी सांगितले. कार्यालयाकडे नियमित पत्रव्यवहार तसेच पाठपुरावा सुरू असल्याचे पुजारी म्हणाले.
अतिक्रमणात शंभरपेक्षा अधिक पक्क्या घरांचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात येणार असल्याने नागरिकांकडून तीव्र विरोध होत आहे. अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. (वार्ताहर)