डिझेलअभावी रस्त्यातच बंद पडली एस. टी.
By Admin | Updated: September 29, 2014 00:46 IST2014-09-29T00:46:51+5:302014-09-29T00:46:51+5:30
औरंगाबाद : डिझेल संपल्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकातून निघालेली बस रस्त्यातच बंद पडल्याने सर्वसामान्य प्रवासी आणि विद्यार्थ्यांची शनिवारी रात्री मोठी गैरसोय झाली.

डिझेलअभावी रस्त्यातच बंद पडली एस. टी.
औरंगाबाद : डिझेल संपल्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकातून निघालेली बस रस्त्यातच बंद पडल्याने सर्वसामान्य प्रवासी आणि विद्यार्थ्यांची शनिवारी रात्री मोठी गैरसोय झाली. विशेष म्हणजे औरंगाबादहून प्रवास सुरू केल्यानंतर ही बस जालन्यात बंद पडली. तब्बल तासाभरानंतर इंधन मिळाल्याने पुढील प्रवास सुरू झाला. परंतु इंधन भरण्यात निष्काळजीपणा केल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.
मध्यवर्ती बसस्थानकातून औरंगाबाद - नागपूर बस रात्री सुटली. परंतु जालन्यात पोहोचत नाही तोच ती बंद पडली. याविषयी प्रवाशांनी अधिक माहिती घेतली असता बसमध्ये डिझेल नसल्याने ती बंद पडल्याचे समोर आले.
एक तासानंतर इंधन मिळाल्याने बस पुढे निघाली. परंतु मिळालेले डिझेल अपुरे असून, ही बस नागपूरला पोहोचणार नाही, असे चालक-वाहकांकडून प्रवाशांना सांगण्यात आले. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यातील परीक्षेसाठी नागपूरला जाणारे अनेक विद्यार्थी या बसमध्ये होते. सकाळी ९ वाजता परीक्षेची वेळ असल्याने त्यापूर्वी बस नागपूरला पोहोचणार नसल्याची चिंता विद्यार्थ्यांना सतावत होती. याविषयी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना माहिती दिली. याविषयी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनाही माहिती मिळाली. परंतु पुरेसे इंधन मिळाल्याने बस नागपूरला पोहोचेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जालन्यानंतर पुढील टप्प्यात इंधन घेऊन बस सकाळी ७ वाजता नागपूरला पोहोचल्याचे प्रवाशांनी सांगितले. तासभर उशिराने बस पोहोचली. लांब पल्ल्याचा प्रवास सुरू करण्याआधीच बसमध्ये डिझेल भरण्याची गरज आहे. बसमध्ये इंधन आहे की, नाही हे पाहण्याची जबाबदारी संबंधित चालकाची आहे, असे प्रवाशांनी सांगितले.