व्हायरल आणि कोरोनाचा फरकच कळेना
By | Updated: November 28, 2020 04:05 IST2020-11-28T04:05:59+5:302020-11-28T04:05:59+5:30
दोन दिवस असलेले ढगाळ हवामान आणि थंडीमध्ये झालेली वाढ या वातावरणातील बदलाने विषाणूसंसर्गाचा अनेकांना त्रास होत आहे. एरवी अत्यंत ...

व्हायरल आणि कोरोनाचा फरकच कळेना
दोन दिवस असलेले ढगाळ हवामान आणि थंडीमध्ये झालेली वाढ या वातावरणातील बदलाने विषाणूसंसर्गाचा अनेकांना त्रास होत आहे. एरवी अत्यंत सामान्य आजार म्हणून याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, यावर्षी कोरोनाची धास्ती असल्याने घशात होणारी खवखव किंवा झालेली सर्दीही कोरोनाचीच आहे की काय, याची नाहक भीती अनेकांना वाटत आहे. त्यामुळे आपल्यामध्ये दिसून येणारी लक्षणे ही कोरोनाची आहेत, की संसर्गाची, हे न कळल्याने अनेक जण चिंतेत आहेत. सांधेदुखी, कफ या आजारांचे रुग्णही सध्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत.
थंडीच्या दिवसांत सकाळी चालणे किंवा व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्यांनी आवर्जून गरम कपडे परिधान करावेत, तसेच दररोजच्या आहारात कडधान्याचा समावेश करावा. काकडी, दही व थंड पदार्थांचे अतिसेवन टाळावे, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.
चौकट :
लक्षणांकडे लक्ष ठेवा
थंडी वाढल्याने सर्दी, खोकला, किंचितसा ताप, असे आजार डोके वर काढतात; परंतु यावर्षी कोरोनामुळे या आजारांची सर्वसामान्यांमधील भीती वाढली आहे. घसादुखी, सर्दी, नाक गळणे, खोकला जर तीन दिवस औषधी घेऊनही कमी झाला नाही, तर कोविड तपासणी करणे गरजेचे आहे. या आजारांसोबतच जर खूप ताप, अंगदुखी, अशक्तपणा, अशी लक्षणे जाणवत असतील तर मात्र त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आंबट पदार्थ खाणे टाळावे, तसेच घशात खवखव जाणवताच दिवसातून तीन वेळेस वाफ घेऊन सर्दी लवकर आटोक्यात आणावी.
-डॉ. नीलेश लोमटे