मतविभाजनाचा दिग्गजांना धोका

By Admin | Updated: November 7, 2016 00:26 IST2016-11-07T00:20:45+5:302016-11-07T00:26:12+5:30

बीड मतविभाजनाच्या धोक्यामुळे सर्वच नेत्यांची चिंता वाढली

Dictatorial giants risk | मतविभाजनाचा दिग्गजांना धोका

मतविभाजनाचा दिग्गजांना धोका

प्रताप नलावडे  बीड
मतविभाजनाच्या धोक्यामुळे सर्वच नेत्यांची चिंता वाढली असून हा धोका टाळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आधी उमेदवारांची शोधाशोध आणि त्यानंतर मतविभाजनाची टांगती तलवार नेत्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सहाही नगरपालिकांमध्ये मतविभाजनाला बे्रक लावण्यात यशस्वी ठरणाऱ्या नेत्यालाच विजयी घौडदौड करता येईल, हे आता निश्चित आहे. ११ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतरच लढती स्पष्ट होतील.
बीड नगरपालिका निवडणुकीत नगरपालिकेवर गेली पंचवीस वर्षापासून निर्विवाद वर्चस्व असणाऱ्या डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनीच काकू-नाना विकास आघाडीच्या माध्यमातून तगडे आव्हान समोर ठेवले आहे. दोन क्षीरसागरांमध्येच ही निवडणूक रंगणार असतानाच एमआयएमने नगराध्यक्षपदासाठी शेख निजाम यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उघडपणे दोन गट पडलेले असतानाच भाजपा आणि शिवसेनेची युती अजूनही झालेली नसल्याने दोघेही स्वतंत्रपणे लढणार असल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीडमध्ये भाजपा युती करण्याला उत्सुक नसल्याने युतीच्या मतांचेही विभाजन अटळ आहे.
माजी मंत्री आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेवर आता राष्ट्रवादीतील दोन्ही गटांची मदार आहे. एका बाजुला पुतण्या तर दुसऱ्या बाजूला भाऊ अशा कात्रीत सापडलेल्या जयदत्त क्षीरसागर हे अजूनही या दोन्ही गटात समेट घडवून आणू शकतील, अशा अपेक्षेवर कार्यकर्ते आहेत. क्षीरसागर यांच्या घरातच दोन गट पडल्याने कार्यकर्त्यांचीही मोठी गोची झाली आहे. नेमके जायचे कोणाच्या बाजूने हा प्रश्न पडलेल्या कार्यकर्त्यांनी आता ‘अण्णां’च्या भूमिकेवर आपला निर्णय अवलंबून असल्याचे सांगण्यास सुरूवात केली आहे.
शिवसंग्राम आणि काँग्रेस या दोघांचीही अवस्था अगदीच केविलवाणी झाली आहे. शिवसंग्रामने दिलीप गोरे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. ते मूळचे शिवसैनिक. पुढे ते राष्ट्रवादीमध्ये आले. डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यासोबत नगरपालिका राजकारणात सक्रिय असताना त्यांना भारतभूषण यांनीच काही महिन्यांसाठी नगराध्यक्षपदाची संधी दिली होती. आता ते शिवसंग्राममधून निवडणूक लढवित आहेत.
माजलगावमध्ये रा.कॉ. अडचणीत !
माजलगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फाटाफूट झाली असून मोहन जगताप यांनी आघाडीचे राजकारण करत राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे केले आहे. रा.कॉ. मधून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून अजूनही नाराजी असून माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांच्यासमोर मतांचे विभाजन रोखण्याचे आव्हान आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर अनेक मातब्बरांनी दावा केलेला होता. त्यामुळे निर्माण झालेल्या नाराजीला रोखायचे कसे असा प्रश्न असतानाच आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीनेच आव्हान उभे केल्याने या दोन्ही आघाडीवर लढायचे कसे, हा प्रश्न सोळंके यांच्यासमोर आहे.
धारूरमध्ये आयात उमेदवार !
धारूर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपा यांना काही वॉर्डमधून सक्षम उमेदवारच मिळू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना ऐनवेळी काही ठिकाणी इतर वॉर्डमधील उमेदवार उभे करून वेळ मारावी लागली. ऐनवेळी इतर वॉर्डातील उमेदवार दिल्याने आता दोन्ही पक्षांसमोर मतविभाजनाचा धोका आहे. याठिकाणी तिसरी आघाडी आणि शिवसेना एकत्रपणे लढत आहे. सेना-भाजपा युती होणार असल्याची चर्चाच होत राहिली. परंतु प्रत्यक्षात दोन्ही पक्षांनी आपआपले उमेदवार उभे करून सेनेने आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे युतीच्या मतांचे विभाजन येथेही अटळ आहे.
धारूर पालिकेत मातब्बरांनी यावेळी पालिका निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा घेतलेला निर्णयही भाजपा आणि राष्ट्रवादीला अडचणीत आणणारा आहे. विठ्ठलराव जाधव यांचे पुतणे बाळासाहेब जाधव यांनी कौटुंबिक कारण पुढे करत निवडणुकीपासून अलिप्त राहणे पसंत केले आहे तर नामदेव शिनगारे यांनी आपल्या पत्नीची उमेदवारी देण्याचा निर्णय घेऊनही ऐन वेळी उमेदवारीच दिली नाही. विद्यमान नगराध्यक्ष गोदावरी सिरसट यांचे पती लक्ष्मण सिरसट यांनी रा.काँ. कडे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मागितली होती. परंतु त्यांना उमेदवारी मिळालेली नसल्याने त्यांच्या नाराजीचा सामनाही रा.काँ. ला करावा लागणार आहे.
अंबाजोगाई पालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने असून या दोन्ही पक्षांनी यावेळी विद्यमान नगरसेवकांना नाकारत १४ नवे चेहरे रिंगणात आणल्याने विद्यमान नगरसेवकांच्या नाराजीचे आव्हान दोन्ही पक्षांना पेलावे लागणार आहे. राजकिशोर मोदी यांच्याकडे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. अंबाजोगाई पालिकेवर त्यांचे वर्चस्व आहे. गत निवडणुकीत त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत आघाडी करून आपली ताकद दाखविली होती. अंबाजोगाईत मोदी आणि मुंदडा या दोन नावांभोवती नेहमीच फिरणारी निवडणूक यावेळी मात्र भाजपाने नगराध्यक्षपदाची उमेदवारी अ‍ॅड. शोभा सुनील लोमटे यांना देऊन तिरंगी केली आहे. आता मोदी-मुंदडा आणि लोमटे असा सामना रंगणार आहे.
परळीत देशमुखांच्या भूमिकेने अडचण
परळीत काँग्रेसने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळख असणाऱ्या राजेश देशमुख यांच्या पत्नी राजश्री यांना उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या देशमुख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. यामुळे काँग्रससह राष्ट्रवादी आणि भाजपालाही मतविभाजनाचा धोका निर्माण झाला आहे. ते वैद्यनाथ देवस्थानचे सचिव म्हणूनही कार्यरत आहेत. भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडणुकीपूर्वीच दाखल झालेले सोमनाथ हालगे यांच्या पत्नी सरोजनी या रा.कॉ. च्या उमेदवार आहेत.अनेक वर्षे भाजपात कार्यरत असलेल्या सोमनाथ हालगे यांच्यामुळे भाजपाला मतविभाजनाच्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे. भाजपाने नगराध्यक्षपदाची उमेदवारी सुरेखा विजयकुमार मेनकुदळे यांना दिली आहे तर काँग्रेसने टी.पी. मुंडे यांच्या कन्या जयश्री यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसमध्ये फूट पडल्याने या फुटीचा फायदा नेमका कोणाला मिळणार, याची सध्या चर्चा आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

Web Title: Dictatorial giants risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.